ठाणे : जिल्ह्यातील कातकरी समज अद्यापही दारिद्र्य आणि विविध समस्यांमध्ये जगत आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने या जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचले आहे. येत्या ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून साधणार आहेत. तर गावातील प्रत्येक प्रोढ सभासद या कालावधीत उपाशी राहून आत्मक्लेश करणार आहे. तसेच सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या – पाड्यात आपल्या घरा – दारात आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार असल्या श्रमजीवी संघटनेने स्पष्ट केले.
निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंध:कारात लोटले गेले आहे. वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे. रोजगार हमी योजनेतील थकित मजुरी मिळत नसल्याने शेकडो कुटुंब उपाशी आहेत. त्यातच रासायनिक दारूमुळे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत. अनेकांच्या घरांची स्वप्ने उध्वस्त झाल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे.
अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्धार लढा पुकारला आहे. हा लढा सुरु असताना संघटनेच्या प्रत्येक गावा पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करुन सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या – पाड्यात आपल्या घरा – दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार आहे.
‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ ५ आणि ६ नोव्हेंबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. शासनाने तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावले उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानाने उभे राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या लढ्यातून केली जाणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिलेली आहे.
आत्मक्लेशातून आत्मनिर्धार केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा ‘निर्धार’ आहे, असे स्पष्टीकरण श्रमजीवी संघटनेने दिले.
