ठाणे : येथील नौपाडा भागातील गोखले मार्गावरील बस थांबा चोरीला गेल्याचे प्रकरण गाजत असतानाच, आता सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या ठाणे पश्चिम व पुर्व स्थानक परिसरासह नौपाडा भागात दिशादर्शक आणि नो पार्किंग फलक चोरीला जाण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढू लागले आहेत. पालिकेकडून लावलेले फलक चोरीला गेल्याने वाहतूक पोलिसांना नो पार्किंग क्षेत्रात उभ्या केलेल्या वाहनांवर करणे शक्य होत नसून या वाहनचालकांसोबत कारवाई करण्यावरून वाद होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या फलक चोरीसंदर्भात पोलिसांनी आता पालिकेला पत्र देऊन कळविले आहे.

ठाणे येथील गोखले मार्गावर एका रात्रीत बस थांबा चोरीला गेल्याचे आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी तो पुन्हा सापडल्याचे प्रकरण नुकतेच घडले. हे प्रकरण चर्चेत असतानाच, आता दिशादर्शक फलक चोरीचे प्रकरण पुढे आले आहे. ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. कोंडी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार रस्त्यांवर विविध ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावून तिथे वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, शहरात वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी काही वाहतूक बदल लागू करण्यात आले असून यामध्ये काही मार्गावरील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : ठाणे : गोएंका शाळेबाहेर पालकांचे आंदोलन, प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी

ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या ठाणे पश्चिम आणि पुर्व स्थानक परिसरासह जुन्या ठाण्यातील म्हणजेच नौपाडा परिसरात पालिकेने फलक लावले आहे. यामध्ये दिशादर्शक फलक, नो पार्किंग फलक, सम-विषम पार्किंग फलक, एकेरी वाहतूक मार्ग फलक यांचा समावेश आहे. परंतु हे फलक गेल्या काही महिन्यांपासून चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळेत हे फलक चोरीला जात आहेत. यामुळे नो पार्किंग, सम-विषम पार्किंगच्या ठिकाणी बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर, त्याठिकाणी फलक नसताना कारवाई कशी केली, यावरून चालक वाद घालतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. चोरीच्या किंवा वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्याच्या उद्देशातून फलक चोरीला जाण्याचे प्रकार घडत असावेत असा अंदाज पोलिसांना आहे. या संदर्भात ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून याबाबत लक्ष लागण्याबाबत कळविले आहे.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली, आरोपींचा शोध सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ठाणे पश्चिम व पुर्व स्थानक परिसरासह नौपाडा भागात दिशादर्शक आणि नो पार्किंग, समविषम पार्किंग, एकदिशा मार्ग असे पालिकेने लावलेले फलक चोरीला जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. यामुळे रस्त्यावर बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर कारवाई करताना अडचणी येत आहेत. फलक चोरीला जात असल्याबाबत पालिका प्रशासनाला कळविले आहे. तसेच फलक चोरीला कशामुळे जात आहेत, हे चोरटे पकडल्यानंतर समजू शकेल.” – विनयकुमार राठोड, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा