ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी नागलाबंदर, भाईंदरपाडा भागात गर्डर उभारले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात ८ ऑगस्टपर्यंत दररोज मध्यरात्री वाहतुक बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल दररोज ११ ते पहाटे ४ या वेळेत लागू असतील. त्यासंदर्भातील अधिसूचना ठाणे वाहतुक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार आणि कासारडवली ते गायमुख या मेट्रो चार अ मार्गिकेच्या निर्माणाची कामे मबंई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे. घोडबंदर भागात या कामासाठी रस्ते तसेच दुभाजकांवर मार्गावरोधक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आहेत. घोडबंदर भागातून हलक्या वाहनांची वाहतुक दिवसरात्र सुरु असते. तसेच, गुजरातहून उरण जेएनपीटीच्या दिशेने आणि भिवंडी, उरण जेएनपीटीहून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहनांचा भार देखील या मार्गावर रात्री आणि दुपारी सुरु असतो. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्याने त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. त्यात घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे
मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी घोडबंदर येथील नागलाबंदर ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा पर्यंत दोन्ही मार्गिकांवर गर्डर बसविले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल करण्याची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार, गायमुख मेट्रो स्थानकाच्या कामासाठी या भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना या परिसरात प्रवेश बंदी केली आहे. येथील वाहने या परिसरातून घोडबंदर ते ठाणे या विरुद्ध मार्गिकेवरील वाहिनीवरून वाहतुक करत पुढे डावे वळण घेऊन इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे पुन्हा ठाणे ते घोडबंदर या मुख्य मार्गिकेवरुन वाहतुक करतील. तर हलकी वाहने सेवा रस्त्यावरून वाहतुक करु शकतील.
घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागलाबंदर येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने नागलाबंदर सेवा रस्ता, लोढा स्प्लेंड्रा गृहसंकुल येथे मुख्य वाहनीवरुन वाहतुक करु शकतील. हे वाहतुक बदल गुरुवारपासून सुरु झाले असून ते ८ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहेत. वाहतुक बदल दररोज रात्री ११ ते पहाटे ४ यावेळेत लागू असतील असे अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.