ठाणे – वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक १६ परिसरात बुधवारी एका कंपनीच्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.

वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक १६ भागात एका कंपनीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी १.४६ वाजता अंदाजे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह येथील खणलेल्या खड्ड्यामध्ये स्थानिकांना तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच, श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी खड्ड्यातील मृतदेह बाहेर काढून तो श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. मृताची ओळख पटली नसून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.