कल्याण : मागील काही महिन्यांपासून टिटवाळा-मांडा भागाच्या काही भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. या सततच्या पाणी टंचाईला कंटाळून महिलांनी पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर मंगळवारी हंडा मोर्चा काढला. अ प्रभाग हद्दीतील प्रत्येक भागाला पुरेशा दाबाने दैनंदिन पुरवठा झालाच पाहिजे, अशी मागणी मोर्चेकरांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली.

या मोर्चात महिला वर्ग अधिक संख्येने सहभागी झाला होता. मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी केले. मांडा, टिटवाळा, बल्याणी रोड, वासुंद्री रोड भागातील वस्त्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांना परिसरातील विहिरी, कुपनलिकांच्या पाण्यांवर अवलंबून राहावे लागते. विहिरी, कुपनलिकांचे पाणी पिऊन आरोग्य बिघडण्याची भीती असल्याने रहिवाशांची कुचंबणा होत आहे.

हेही वाचा : ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई

मांडा, टिटवाळा भागातील पाणी टंचाई कमी करा म्हणून नागरिकांनी अनेक तक्रारी पालिका आयुक्तांसह पालिकेच्या अ प्रभागात केल्या आहेत. टिटवाळ्यातील वाढत्या वस्तीच्या तुलनेत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे. पालिकेकडे नियमित तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही म्हणून मंगळवारी मांडा, टिटवाळा भागातील महिलांनी हंडा मोर्चा काढून परिसराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

हेही वाचा : ठाणे : उड्डाणपूलाखाली बेकायदा वाहनतळासह टपऱ्या

वाढती बांधकामे

टिटवाळा, मांडा, बल्याणी भागात बेकायदा चाळी, झोपडया उभ्या राहिल्या आहेत. या भागाला पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाणी पुरवठा केला जातो. जुन्या वस्तीचा पाणी पुरवठा इतर भागात वळविण्यात येत असल्याने शहराच्या इतर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. बेकायदा बांधकामांमुळे पाणी चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम गृहसंकुलांना बसत आहे.

हेही वाचा : घाटकोपर – डोंबिवली प्रवासात रिक्षेत विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांडा परिसरात पाणी टंचाईची परिस्थिती आहे. येथील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागात जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. या भागात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मांडा, टिटवाळा भागाला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल.

अनिरुध्द सराफ (उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग)