ठाणे : ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील इंदीरानगर परिसरात नव्याने अंथरण्यात आलेली जलवाहीनी कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी नितीन कंपनी जंक्शन येथे जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे लोकमान्यनगर आणि सावरकरनगर भागाचा पाणी पुरवठा शनिवारी चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.
वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच दुरुस्ती कामामुळे तसेच तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईच्या समस्येत वाढ होते. दरम्यान, अशाचप्रकारे लोकमान्यनगर आणि सावरकरनगर भागाचा पाणी पुरवठा शनिवारी चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेले ११६८ मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी नितिन कंपनी जंक्शन येथे ७५० मि. मी व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या भागात पाणी नाही
या कालावधीत ठाणे महापालिकेतंर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत येत असलेल्या भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
