भिवंडी शहरातील कामतघर भागातील पाच महिन्यांपूर्वीचा प्रसंग. एका चाळीच्या आवारात पहाटे एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली. गितादेवी ऊर्फ पायल पासवान (१७) असे त्या तरुणीचे नाव. तिच्या पोटावर, छातीवर, पाठीवर चाकूने भोसकल्याने खूप रक्तस्राव सुरू होता. गळ्यावरही वार करण्यात आले होते. तशाही स्थितीत ती जिवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती. या आवाजाने जागे झालेले चाळीतील रहिवासी घराबाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. पण चाळीतील सर्वच खोल्यांना बाहेरून कडय़ा घालण्यात आल्या tv18होत्या. अखेर एका रहिवाशाने घराची कडी उघडण्यासाठी मित्राला फोन करून बोलावून घेतले. या मित्राने लगेचच धाव घेऊन चाळीतील सर्वच घरांच्या कडय़ा उघडल्या. यानंतर चाळीतील रहिवासी घराबाहेर पडून गीतादेवीच्या मदतीसाठी धावले. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलीस घटनास्थळी पोहचले. भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात गीतादेवीला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेने गीतादेवीची बहीण रीतादेवी पुरती भेदरून गेली होती. घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव रोडे यांनी आधी तिचे सांत्वन केले. मग, तिच्याकडे घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली.  ‘कामतघर भागातील एका चाळीत माझे कुटुंब राहते. माझे आई-वडीलसुद्धा याच भागातील एका चाळीत राहतात. त्यांच्यासोबत लहान बहीण गीतादेवी राहायची. आजीच्या आजारपणामुळे आई-वडील बिहारमधील मूळगावी गेल्याने गीतादेवी घरात एकटीच होती. यामुळे आमचे संपुर्ण कुटुंब तिच्या घरी राहायला गेले होते. रात्रपाळीच्या कामासाठी पती सायंकाळी कामावर गेले होते. त्यामुळे मी, माझी तीन मुले आणि गीतादेवी, असे पाच जण घरात होतो. रात्री सर्व जण झोपलेले असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. मात्र, दरवाजा ठोकणारा व्यक्ती आपली ओळख सांगत नसल्यामुळे दरवाजा उघडण्यास नकार दिला. यामुळे त्याने जोरात धक्का देऊन दरवाजा तोडला. यानंतर त्याने गीतादेवीला घराबाहेर नेले आणि तिची हत्या केली. त्या वेळी त्याने दरवाजाला बाहेरून कडी घातल्याने मी मदतीसाठी जाऊ शकले नाही,’ असे रीतादेवीने चौकशीत सांगितले. घरात शिरलेली व्यक्ती ओळखीची होता का, अशी विचारणा केल्यावर तिने सुरुवातील ‘नाही’ असे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी त्या व्यक्तीचे वर्णन विचारताच तिने राजा नावाच्या मुलाबद्दल संशय व्यक्त केला. महिनाभरापूर्वी भिवंडी स्टेशन परिसरातून जात असताना राजा याने गीतादेवीची छेड काढली होती. तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे ती व्यक्ती राजाच असावी, असे रीतादेवी म्हणाली.
या उलटसुलट माहितीबद्दल पोलिसांना साशंकता होती. परंतु, तरीही तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी राजाला ताब्यात घेतले. परंतु, खोल चौकशी करूनही राजाने आपण हा खून केला नाही, याचाच धोषा लावला. त्यामुळे तपास करणारे अधिकारी संभ्रमात पडले. रीतादेवीने सांगितलेल्या माहितीबद्दल संशय होताच. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक के. एन. वाघ यांच्या पथकाने खातरजमा केली. त्यामध्ये रीतादेवीने दिलेल्या माहितीत फारसे तथ्य नसल्याचे समोर आले. तसेच या घटनेच्या वेळी ती घरातच नव्हती. या घटनेनंतर ती घरी आली होती, अशी माहितीही या पथकाला मिळाली. पथकाने ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव रोडे यांना दिली. त्यानंतर रोडे यांनी तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच या घटनेसंबंधी पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळ्या दिशेने तपासाला सुरुवात केली. गीतादेवीचे त्या रात्रीचे कॉलडिटेल्स् तपासले आणि तेथूनच खऱ्या अर्थाने तपासाला दिशा मिळाली. त्या रात्री तिच्या फोनवर रूपजी नरेश सहानी (२५) याचा शेवटचा कॉल होता. यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने या खुनाची कबुली दिली.  
रूपजीने गीतादेवीची हत्या करण्यामागचे जे कारण सांगितले ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. गीतादेवी तिच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी कंपनीतील मुलांना बोलवायची. त्यामुळे बिहारचे नाव खराब होत असल्याने आपण तिचा खून केला, असे रूपजीने चौकशीत सांगितले. ‘त्या रात्री लघुशंका करण्यासाठी घराबाहेर आलो तेव्हा गीतादेवी मोबाइलवर बोलत असल्याचे ऐकू आले. त्यामुळे तिला जाब विचारण्यासाठी तिच्या घरी गेलो. ‘तू ऐसा गंदा काम क्यूँ करती है। इससे बिहार का नाम खराब होता है..’ असं तिला म्हणताच तिने माझ्या कानशिलात लगावली. त्यामुळे चाकू आणि लोखंडी सळई घेऊन तिच्या घरात शिरलो आणि तिला घराबाहेर काढून तिचा खून केला,’ असे रूपजीने सांगितले.
खुनामागचे कारण ऐकून पोलीसही हबकले. गीतादेवी मूळची बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्य़ातील निहापूर गावची रहिवासी. पण, कामाच्या निमित्ताने तिचे कुटुंब भिवंडीत स्थायिक झाले. रुपजीसुद्धा बिहारचा मूळ रहिवासी. त्याचे या घटनेच्या आधी जेमतेम चार महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. गीतादेवीच्या वागण्यामुळे बिहारचे नाव खराब होत असल्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्या विषयी तो आपल्या गावकऱ्यांना वारंवार बोलून दाखवत होता. हा राग त्याला अनावर झाला आणि यातूनच त्याने हिंसक पाऊल उचलले. यामुळे त्याची कारागृहात रवानगी झाली.