कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराजवळील वाहनतळावर पावसामुळे गाळ साचला आहे. या गाळातून भाविकांची वाहने धावतात. पाऊस सुरू असला की त्याठिकाणी चिखल तयार होतो. त्यामुळे या वाहनतळावर निसरडे झाले आहे. काही दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या वाहनतळावरील गाळ, चिखल काढून टाकण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
टिटवाळा येथे महागणपतीचे तीर्थक्षेत्र आहे. महागणपतीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक याठिकाणी वाहनाने, रेल्वेने येतात. वाहने घेऊन येणारे भाविक महागणपती मंदिर शेजारील पालिकेच्या वाहनतळावर वाहने उभे करून दर्शनासाठी जातात. हा वाहनतळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारित येतो. या वाहनतळावर भाविकांच्या वाहनांची सतत वर्दळ असते. भाविक याठिकाणाहून पायी दर्शनासाठी जातात.
पाऊस सुरू झाल्यापासून महागणपती मंदिराजवळील पालिकेच्या वाहनतळावर गाळाचे थर तयार झाले आहेत. या वाहनतळावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने वाहनांची चाके गाळाला लागून तेथे चिखल तयार होत आहे. उन पडल की चिखलाचे लगदे तयार होतात. पाऊस सुरू झाला की पुन्हा हे लगदे विरघळून त्याचा गाळ तयार होतो. मुसळधार पाऊस सुरू झाला की वाहनतळावर पाण्यामुळे वाहन चालकांना गाळाचा अंदाज येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहने घसरतात. दुचाकी स्वार याठिकाणी घसरून पडतात. पादचाऱ्यांची याच वाहनतळावरून येजा असते. त्यामुळे या निसरड्या भागातून जाताना भाविकांना कसरत करावी लागते.
वाहनतळावरील गाळ आणि तयार झालेला चिखल काढून टाकण्यात यावा, अशी भाविकांची मागणी आहे. त्याकडे पालिका आणि इतर कोणतेही प्रशासन लक्ष देत नाही. दररोज टिटवाळा भागात पालिकेचे सफाई कामगार स्वच्छतेसाठी येतात. त्यांनाही वाहनतळावर साचलेला गाळ काढून टाकावा म्हणून सुचत नाही, असे स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक वेळा नागरिकांनी पालिका सफाई कामगारांना वाहनतळावर साचलेला गाळ साफ करण्याची मागणी केली. त्यावेळी हे आमचे काम नाही. तुम्ही आमच्या वरिष्ठांना सांगा, त्यानंतर आम्हाला सूचना मिळाली तर आम्ही ते काम करू अशी उत्तरे कामगारांकडून देण्यात येेतात, असे नागरिक, व्यापाऱ्यांनी सांगितले.
पावसाचे अद्याप तीन महिने जायचे आहेत. या कालावधीत वाहनतळावरील गाळ काढला नाहीतर एखादे वाहन भरकटून पादचारी भाविकांच्या अंगावर जाण्याची भीती आहे. दुचाकी स्वारांना याठिकाणी गंभीर दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणतीही यंत्रणा वाहनतळावरील गाळाची दखल घेत नसल्याने भाविक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. अधिक माहितीसाठी मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पाऊस सुरू झाल्यापासून टिटवाळा येथील महागणपती मंदिराजवळील पालिकेच्या वाहनतळावर गाळ साचला आहे. या वाहनतळावर भाविकांच्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्याचा वाहनांसह पादचारी भाविकांना त्रास होतो. पालिका प्रशासनाने याविषयाची दखल घ्यावी. – विजय देशेकर, सामाजिक कार्यकर्ते.