उल्हासनगरः उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिरात एका ४५ वर्षीय नृत्य शिक्षकाने अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नृत्य शिक्षकाला अटक केली आहे.

आपल्या पाल्याला शिक्षणासोबतच इतरही कला अवगत व्हाव्यात अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे शाळेला सुट्ट्या लागल्यानंतरही उन्हाळी शिबिरांमध्ये त्यांना पाठवण्याचा प्रकार आता वाढला आहे. त्यातही पारंपरिक गोष्टींऐवजी नव्या अनेक गोष्टींचे शिक्षण पाल्यांना देण्याचा पालकांचा आग्रह असतो. मात्र अशाच एका उन्हाळी शिबीरात घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेने सध्या उल्हासनगर शहरात संताप व्यक्त होतो आहे.

उल्हासनगर कॅम्प चार येथील एका शिकवणीत उन्हाळी सुट्टीनिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक लहान मुलामुलींनी सहभाग घेतला होता. याच शिबिरात एका अडीच वर्षाच्या मुलाचाही प्रवेश घेण्यात आला होता. अचानक एक दिवस शिबिरातून घरी आल्यानंतर त्या अडीच वर्षीय मुलाला शारीरिक वेदना जाणवू लागल्या. त्याने तशी आई वडिलांना सांगितले. त्याबाबत पालिकांनी मुलाला अधिक विचारले असता शिबिरातील नृत्य शिक्षकाने त्याच्यासोबत केलेल्या प्रसंगाची माहिती चिमुकल्याने पालकांना दिली. हे ऐकल्यानतंर पालकांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराबद्दल माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनाही तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नृत्य शिक्षकाला त्याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत त्याला अटक केली. या घटनेने संपूर्ण शहरांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.