उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील विविध रस्त्यांवर उभी असलेली बेवारस वाहने वातुकीसाठी अडथळा ठरत होती. सोबतच या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होणार होते. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकतीच उल्हासनगर महापालिकेने स्थानिक पोलीस आणि शहर वाहतूक शाखेच्या मदतीने शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई केली आहे. नोटीस दिल्यानंतर एकूण ३७ वाहने मालकांनी हटवली. तर १२ वाहने पालिकेने जप्त केली आहेत.

हेही वाचा : किसन कथोरेही नितीन गडकरींच्या भेटीला, मुरबाड मधील विकास कामांवर चर्चा

उल्हासनगर शहराचा बहुतांश भाग व्यापारी आहे. शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये विविध प्रकारच्या बाजारपेठा आहेत. त्यामुळे शहरात दररोज हजारो वाहने शहरात येजा करत असतात. उल्हासनगर शहराची प्रति चौरस मीटर लोकसंख्येची घनता मोठी आहे. शहरातील रस्त्यांची रूंदीही कमी आहे. त्यात शहरातील विविध भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला उभी केली जाणारी वाहने वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरतात. खुद्द पालिकेच्या परिवहन सेवेलाही या वाहनांचा फटका बसतो. या वाहनांसह शहरातील रस्त्यांच्या कडेला उभी असलेली बेवासर वाहने रस्ते वाहतुकीसाठी अडचणीची ठरत होती. त्यामुळे रस्ते अतिक्रमणमुक्त राहण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने कारवाई सुरू केली होती.

हेही वाचा : कल्याण : टिटवाळा – मांडा भागात पाणी टंचाई, महिलांचा अ प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना यासाठी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या मदतीने शहरातील अशा बेवारस वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. शहरातील विविध भागात ४९ बेवारस वाहने पडून असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेच्या वतीने अशा वाहनांवर नोटीस चिटकावण्यात आली होती. ही वाहने काढण्याचे आदेश पालिका प्रशासनाने संबंधित वाहन मालकांना दिले होते. मुदतीत वाहने न काढल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला होता. ही मुदत संपल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने मंगळवारपासून अशा वाहनांवर कारवाई सुरू केली. ४९ पैकी ३७ वाहने वाहन मालकांनी हटवल्याने त्यावर कारवाई झाली नाही. मात्र उर्वरित १२ वाहनांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली आणि ती वाहने हटवली. ही वाहने आता जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.