Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले असून त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी म्हणजेच शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या निमित्ताने, लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ”फोकलोक” ( FolkLok ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. १९७८ मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. १९९८मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता २६ वर्षांनी नुतनीकरण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून ३१ कोटी रुपये उपलब्ध करून दिला होता. या निधीतून, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नुतनीकरण करण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्य़े नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती. त्यानुसार, गडकरी रंगायतनचे संपूर्ण रुप पालटून टाकण्यात आले आहे.
असे नूतनीकरण करण्यात आले
इमारतीच्या बांधकामाची संपूर्ण दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोअरिंग, रंगमंचाचे नुतनीकरण, नवीन खुर्च्या, नवीन अकॉस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे-खिडक्या, नवीन गालिचा, फर्निचर, समोरील आणि मागील बाजूच्या दर्शनी बाजूचे सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, नवीन विद्युत व्यवस्था, नवीन ट्रान्सफॉर्मर व जनरेटर, ज्येष्ठ नागरिकांकरिता उद्वाहक (लिफ्ट), रंगमंचावरील विद्युत दिवे आणि ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा अशी कामे या निधीतून करण्यात आली आहेत.
नांदी आणि फ्लूजन
लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी सजवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे हे युवा कलाकार नांदी सादर करणार आहेत. त्यांना केदार भागवत (ऑर्गन) आणि आदित्य पानवलकर (तबला) हे कलाकार वादन साथ करतील. तसेच, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकार ”फ्लूजन” हा कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यात, पं. विवेक सोनार (बासरी), पं. मुकुंदराज देव (तबला), मोहन पेंडसे (व्हायोलीन), किरण वेहेले (कीबोर्ड), अभिषेक प्रभू (बेस गिटार) आणि सचिन नाखवा (ड्रम्स) हे कलाकार सहभागी होणार आहेत.
”फोकलोक” कार्यक्रम प्रवेशिका
नुतनीकृत रंगायतनचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ”फोकलोक” हा लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा दमदार कार्यक्रम ठाणेकर रसिकांना विनामूल्य पाहता येईल. या कार्यक्रमात, रंगायतनमधील पहिल्या दहा रांगा निमंत्रितांसाठी राखीव असतील. उपबल्ध प्रवेशिकांचे वितरण गुरूवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता गडकरी रंगायतनच्या तिकिट खिडकीवर सुरू होईल. या प्रवेशिका विनामूल्य आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिकांचे वितरण होईल. एक व्यक्तीस दोन प्रवेशिका घेता येतील, असे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.