डोंबिवली : येथील पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या आठवड्यापासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. बंद घरांची दरावाजे फोडून चोरटे चोरी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्ते भागात तक्रारदार आरती साळी या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घरात सागर थापा हा घरगडी म्हणून काम करत होता. तो मुळचा नेपाळचा राहणार आहे. गेल्या आठवड्यात त्या काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. या कालावधीत घरगडी सागर थापा याने तक्रारदार आरती साळी यांच्या इमारतीचे मुख्य प्रवेशव्दार लोखंडी धारदार सळईने उचकटले. त्याने साळी यांच्या घरात गुपचूप प्रवेश केला. घरातील शय्यागृहातील लोखंडी कपाटातील तिजोरी धारदार कटावणीने फोडून टाकली. या तिजोरीतील एक लाख ५७ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी साळी यांनी तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक शिनकर तपास करत आहेत.

हे ही वाचा…डोंबिवली : पलावा निळजे पुलावर मैत्रिणीच्या वादातून कंपनी व्यवस्थापकावर हल्ला

दुसऱ्या एका प्रकरणात, डोंबिवली पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौकातील एका सोसायटीत राहणाऱ्या ऐश्वर्या विनोद निखाते यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील एक लाख ४६ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. २ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

हे ही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एका चोरीच्या प्रकरणात, गरीबाचापाडा येथील महालक्ष्मी चौकात गोपाळ चौधरी यांचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्याने चौधरी यांच्या दुकानाचे मुख्य लोखंडी व्दार उघडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील शीतकपाटातील शीतपेये, चाॅकलेट, खाऊच्या वस्तू असा एकूण २५ हजार रूपये किमतीचा माल चोरून नेला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल आहे. उपनिरीक्षक नितीन सावंत तपास करत आहेत.