उत्पादनात ४० टक्क्यांची घट; कामाच्या तासांमध्ये घट, कामगारांना सक्तीची रजा

ऋषिकेश मुळे / सागर नरेकर, ठाणे</strong>

पायाभूत सुविधांबाबत आधीच त्रस्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या उत्पादनात मंदीमुळे गेल्या काही महिन्यांपासून ३० ते ४० टक्क्यांची घट झाल्यामुळे येथील उद्योग संकटांत सापडले आहेत.

या औद्योगिक पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर लघु उद्योजकांचा भरणा आहे. अभियांत्रिकी  आणि विद्युत उत्पादने उत्पादीत करणाऱ्या मोठय़ा उद्योजकांकडून मागणी घटल्याने त्याचा फटका लहान कंपन्यांना जाणवू लागला आहे. याच काळात अंबरनाथच्या स्पार्कलेट कंपनीने २०० कामगार कमी केले केल्याने ही झळ अधिक स्पष्ट होते.

कोकण प्रदेशातील महत्त्वाच्या आणि राज्यातील एकूण अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील विविध औद्योगिक पट्टय़ांवर आर्थिक मंदीचे मळभ स्पष्टपणे जाणवू लागले आहे. या भागातील सर्वच उद्योग चालक आर्थिक मंदीच्या चिंतेत आहेत असे ठाणे लघु उद्योजक संघटना (टिसा), कल्याण अंबनाथ उत्पादन संघटना (कामा), अंबरनाथ उत्पादन संघटना (आमा) यांच्यातर्फे सांगण्यात आले. जून महिन्यापासून बडय़ा उद्योजकांकडून सुटय़ा भागांसाठी केली जाणारी मागणी ही कमी झाली असून महिनाकाठी उत्पादनात ३० टक्क्यांची  घट झाली आहे.

उत्पादन खर्च, आर्थिक नफा या गोष्टींची उणीवही भरून निघत नसल्याचे जिल्ह्य़ातील उद्योजकांनी सांगितले. यावर मात करण्यासाठी वागळे इस्टेट आणि भिवंडी येथील १० हून अधिक कंपन्यांनी अभियांत्रिकी उद्योगातील काही कामगारांना कमी केल्याचेही नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.  लहान उद्योग हे मोठय़ा उद्योगांवरच अवलंबून असतात, मात्र मोठे उद्योगच मंदीच्या तीव्रतेत ओढले गेल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उत्पादनात घट झाली आहे, असे टिसाचे संदीप पारीख यांनी सांगितले.

अंबरनाथ पट्टय़ावरही अवकळा

अंबरनाथ शहरात असलेली औद्योगिक वसाहतीत जवळपास एक हजार मोठय़ा आणि तीनशे लहान कंपन्या आहेत. यात रासायनिक, कापड उद्योग, औषधे निर्मिती, सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. यापूर्वीच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कोंडीत सापडलेल्या उद्योग क्षेत्राला आता मंदीचा फटका बसू लागला आहे.

देशात वाहन क्षेत्राला या मंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यावर आधारित अनेक कंपन्या अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत आहेत. यात रबर निर्मिती, त्यावर आधारीत सुटे भाग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मंदीचा तडाखा बसला आहे. रबर क्षेत्रातील ३० ते ४० टक्के उद्योगांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागत आहे.  मागणी कमी झाल्याने उत्पादन कमी करण्याचे धोरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना कायमची सुट्टी देण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. नुकतेच स्पार्कलेट कंपनीने २०० कामगार कमी केल्याची माहिती अ‍ॅडिशनल अंबरनाथ उत्पादन संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली. काही कंपन्यांत कामाचे तासही कमी करण्यात आले आहेत. स्वत:चे भांडवल आणि एकाहून अधिक उद्योग असणाऱ्यांना त्याचा थेट फटका बसला नाही. मात्र या क्षेत्रातील नवउद्योजकांना याचा मोठा फटका बसतो आहे, असेही तायडे यांनी सांगितले आहे.

वेळांमध्ये बदल, सक्तीच्या सुट्टय़ा

मंदीच्या छायेचे संकट टाळण्यासाठी उद्योजकांकडून दैनंदिन कामाच्या तासात कपात करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी कामगार १२ तास करत. ८ तासांचे काम पूर्ण केल्यानंतर ४ तास अतिरिक्त कामाचे असत. मात्र जिल्ह्य़ातील १०० हून अधिक कंपन्यांनी अतिरिक्त ४ तासांचे काम देणे गेल्या महिनाभरापासून बंद केले आहे. तसेच  तीन ‘शिफ्ट’मध्ये काम चालत असे. मात्र बहुतांश कंपन्या या दिवसातून एकच वेळ ठरवून कंपनी सुरू ठेवत आहेत. बहुतांश कंपन्यांनी कामगारांना गणेशोत्सवाचे कारण देत सहा ते सात दिवस सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे समजते आहे.

शासकीय धोरणांमुळे फटका

विविध शासकीय धोरणांमुळे तसेच अनास्थेमुळे उद्योग क्षेत्राला फटका बसत असल्याचे विविध उद्योजकांकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपन्यांना वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळालेला नाही. यापूर्वीच्या शासकीय धोरणांमुळे अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीला मोठा फटका बसला आहे. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असणे, तळोजा आणि शिळफाटय़ाजवळ होणारी कोंडी यामुळे नव्या कंपन्यांनी अंबरनाथकडे पाठ फिरवली आहे. शासनाने केवळ घोषणा न करता औद्योगिक वसाहतींकडे लक्ष द्यायला हवे. औद्योगिक वसाहतींची वाईट अवस्था असल्यामुळे परेदशी कंपन्याही गुंतवणूक करण्यास इच्छुक नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.

उद्योगांची संख्या..

ठाणे परिसरात ३ हजार, भिवंडी येथे ७ हजार, डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४५०, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोशिएशनच्या अखत्यारित नोंदणीकृत ६०० कंपन्या, अंबरनाथ येथे १५०० तर बदलापूर येथे २२३ कंपन्या सध्या कार्यान्वित आहेत.

माझ्या कंपनीत विद्युत वस्तूंचे उत्पादन होते. त्याची निर्यात आम्ही अमेरिका, कोरिया, जर्मनी या देशांमध्ये करतो. मात्र या देशांमधून गेल्या काही दिवसांपासून मागणी येत नाही. यंदाच्या मंदीचे प्रमुख कारण म्हणजे अनेक उत्पादकांनी गेल्या वर्षीचा अंदाज लावून यंदाही अधिक उत्पादन केले. मात्र मागणीच ढासळल्याने उत्पादन कंपन्यांच्या गोदामांमध्ये पडून आहे.

– सुजाता सोपारकर, इंट्रान प्रायव्हेट लिमिटेड-अध्यक्ष, उपाध्यक्ष टिसा

२३३ विविध क्षेत्रातल्या कंपन्या असलेल्या बदलापूर औद्योगिक वसाहतीलाही याचा फटका बसला आहे. यात रबर, रासायनिक, कापड आणि सुटे भाग निर्मितीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मागणी घटल्याने कामाचे तास कमी झाले आहेत. काम नसल्याने कामगारांचा पगार द्यायचा कसा असाही सवाल उपस्थित होत असल्याने कंपन्यांचे व्यवस्थापन चिंतेत आहे. वाहतूक क्षेत्रालाही त्याचा फटका बसतो आहे. अनेकांनी ट्रक, टेम्पो आणि अवजड वाहने दुसऱ्या ठिकाणी वळवली किंवा विकली आहेत.

– शक्ती कन्नन, अध्यक्ष-बदलापूर इंडस्ट्रीयल वेलफेअर संघटना

अभियांत्रिकी क्षेत्राची सध्याची अवस्था ही जवळजवळ ‘बंद’ असल्यासारखीच आहे. कंपनीत तयार झालेले उत्पादन हे सध्या तसेच पडून असून विविध मोठय़ा कंपन्यांकडून येणारी सुटय़ा भागांची मागणीत ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे.

– देवेन सोनी, अध्यक्ष- कामा