मूर्तीच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ; कच्चा माल दरवाढीचा फटका

सर्वच क्षेत्रांत वाढणाऱ्या महागाईचा फटका यंदा गणेशमूर्तीना बसणार आहे. कारागिरांची कमतरता, माती व इतर साहित्यांमध्ये झालेली दरवाढ यामुळे गणेशमूर्ती गेल्या वर्षीपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात महागाईचे ‘विघ्न’ येण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात गणेशाचे आगमन होणार आहे. अवघा दीड महिना उरला असल्याने गणेशशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मंडळांच्या मागणीनुसार शाडूच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करण्याच्या, रंगरंगोटी अशा कामांना वेग आला आहे. परंतु गणेशमूर्ती महागणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तीच्या किमतीत २० ते २५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे, तर शाडूच्या मातीपासून बनवलेला किमतीमध्ये ३० ते ४० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

एक फुटाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत जी गेल्या वर्षी १५००च्या घरात होती, ती दोन  हजापर्यंत गेल्याचे मूर्तीविक्रेते शैलेंद्र घोलप यांनी सांगितले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने तसेच मजुरांच्या १० ते १५ टक्के कमतरतेमुळे ही भाववाढ  झाली आहे, तर शाडूची माती जास्त कुठे मिळत नाही, ती गुजरातवरून मागवावी लागते, तसेच ती महाग असल्याने या मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचेही घोलप यांनी सांगितले.

गणेशोत्सवात सजावटीचे साहित्य लागते. तेसुद्धा महाग असते. त्याचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव भाविकांना खर्चीक ठरणार आहे.

सध्या वसईत विविध ठिकाणी मूर्तिकारांनी कार्यशाळा उघडल्या असून त्यात मूर्ती बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून नोंदणीचा वेग वाढेल, असे मूर्तिकारांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही मूर्तीना पसंती

गणेशभक्तांनी पारंपरिक मूर्तीपेक्षा पर्यावरणस्नेही मूर्तीना पसंती दिली आहे. वसईत शाडूच्या म्हणजेच पर्यावरणस्नेही मूर्ती बनवणाऱ्या आकांक्षा कार्यशाळेमध्ये २० टक्क्य़ांची वाढ झाली असल्याचे मूर्तिकार जितेंद्र राऊत यांनी सांगितले. नेहमीचे ग्राहक असल्याने आम्ही जास्त भाववाढ करत नसून या मूर्तीना मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बाजीराव’ला मागणी

‘जय मल्हार’ फेम रूपातल्या गणेशमूर्तीही या वेळचे वैशिष्टय़ आहेत, तर सिद्धिविनायकाच्या रूपातल्या, पंचमुखी रूपातल्या गणेशमूर्तीना मोठी मागणी आहे, तसेच यंदा नवीन बाजीराव पेशवा रूपातील गणेशमूर्तीलाही अधिक मागणी आहे.