ठाणे : ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सहा हजारहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. हे सीसीटीव्ही बसविण्याचे काम आता ठाणे, भिवंडी शहरात सुरू झाले आहे. आतापर्यंत ८० सीसीटीव्ही ठिकठिकाणी बसविण्यात आले असून लवकरच इतर भागातही सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरात होणाऱ्या चोरी, गुन्हेगारी, वाहतुक नियमांच्या उल्लंघनाला आळा बसण्याची शक्यता आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मंब्रा, दिवा, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, दिवा, अंबरनाथ, बदलापूर भागात लोकसंख्या वाढत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत असते. ठाणे महापालिकेचे ठाणे शहरात काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. तसेच, त्याची दृष्यमानता देखील पुरेशी नाही. त्यामुळे ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील मुख्य चौक, महत्त्वाचे रस्ते, निर्जन स्थळ, सिग्नल परिसर अशा विविध ठिकाणी ६ हजार ५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोट्यवधीचा निधी मंजुर केला होता.

गृह विभागाने निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध परवानग्यांचा टप्पा पार करत आता ठाणे, भिवंडी शहरात मागील काही दिवसांपासून सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ८० सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्यात आले आहेत. लवकरच इतर ठिकाणी देखील हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, सध्या बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाचे नियंत्रण त्या भागातील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसे आहेत कॅमेरे

यामध्ये स्थिर, वर्तुळाकार फिरणाऱ्या कॅमेऱ्यांचा समावेश असेल. तसेच दूरवरून आणि अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे देखील मुख्य चौकात बसविण्यात येणार आहे. वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेऱ्यांचाही सामावेश असेल.

कोणत्या भागात किती कॅमेरे

शहर ठिकाणे सीसीटीव्हींची संख्या
ठाणे ते दिवा३,१६३
भिवंडी शहर१,३४७
उल्हासनगर ते बदलापूर१,५४१
एकूण६,०५१