किशोर कोकणे
ठाणे : आंतररराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये तटस्थ पंच म्हणून ओळख असणारे पिलू रिपोर्टर यांची ठाण्यातील शालेय, क्लब क्रिकेट तसेच येथील क्रिडा विश्वाशी नाळ जुळलेली होती. पंच म्हणून काम करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेची परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. हे वर्ग मुंबईत आयोजित केले जात असत. यासाठी ठाणे तसेच आसपासच्या उपनगरांमधील विद्यार्थ्यांना मुंबईत जावे लागत असे. या विद्यार्थ्यांसाठी वेळात वेळ काढून ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात खास वर्ग आयोजित करणारे पिलू सर हे ठाण्यातील क्रिकेट विश्वासाठी चालते बोलते विद्यापीठच होते.
ठाण्यातील सूवर्णपदक प्राप्त पंच प्रकाश वझे, शानबाग आणि विजय प्रधान यांना घडविण्यात पिलू रिपोर्टर यांचा मोठा वाटा राहीला. दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात पिलूसरांच्या वर्गाला मोठा विद्यार्थी वर्ग उपस्थित असे. पंच परिक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसह क्रिक्रेट प्रेमींसाठीही सरांचे या वर्गातील मार्गदर्शन ज्ञानवर्धक ठरत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या शिष्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
जन्माने, वास्तव्यानेही ठाणेकरच
टेंभीनाका येथील आनंदाश्रमाजवळील पटेल अपार्टमेंट या पारसी गृहसंकुलात पिलू हे त्यांची पत्नी होमाय यांच्यासोबत वास्तव्यास होते. दोन मुली, जावई आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. पिलू यांचा २४ सप्टेंबर १९३८ मध्ये नौपाडा येथील गोखले रोड परिसरात जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे कुटुंबिय टेंभीनाका येथील पारसी गृहसंकुलात वास्तव्यास आले. सेंट जॉन दि बापिस्ट शाळेचे ते माजी विद्यार्थी होते. लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड असल्याने ठाण्यातील एका क्रिकेट संघात त्यांचा फिरकी गोलंदाज म्हणून सामावेश करण्यात आला होता. क्रिकेट सोबतच त्यांना वाचनाची आवड होती. त्यांनी क्रिकेट संदर्भात अनेक पुस्तके वाचली. त्यातून त्यांना क्रिकेट संदर्भात नियमांची माहिती मिळाली. १९९९ मध्ये ‘ठाणे भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
ठाणेकरांचे गुरुजी
ठाणे वैभव करंडक, एन.टी. केळकर व घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, स्पोर्टिग क्लब आयोजित शामराव ठोसर व डॉ. श्रीधर देशपांडे या स्थानिक स्पर्धातून पिलू यांचा नेहमी सहभाग असे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच असतानाही ते आपूलकीने या स्पर्धामध्ये सहभागी होत होते. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच, त्यांचे शिष्य पंच राजेश देशपांडे आणि चंद्रकांत म्हस्के हे त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झाले. ‘पिलू यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. क्रिकेटमधील प्रत्येक नियम, कायदे माहित होते, असे त्यांनी सांगितले. त्यांचे शिष्य प्रल्हाद नाखवा यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. डी. वाय. पाटील क्रिडा प्रेक्षागृहात जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सर विव रिचर्डस उपस्थित होते. रिचर्डस यांनी रिपोर्टर यांच्याकडे पाहताक्षणी त्यांना आवाज दिला आणि विचारपूस केली. त्यामुळे उपस्थितांपैकी अनेकजण चकित झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्कोअरर सुधीर वैद्य आणि स्पोर्टिग क्लब क्रिकेट समितीचे डॉ. राजेश मढवी यांनीही आदरांजली वाहिली. पिलू यांच्याकडे समयसूचकता अचूक होती असे त्यांनी सांगितले.
सुमारे सात महिन्यांपूर्वी
पिलू रिपोर्टर हे टेंभीनाका येथे खाद्यपदार्थ खरेदीसाठी पायी जात होते. येथील सार्वजनिक रस्ता खराब असल्याने ते पाय अडकून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खराब झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
रिपोर्टर हे उत्कृष्ठ पंच होते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडल्यानंतरही ते क्लब, कार्यालयीन सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडायचे. त्यांचे निर्णय हे अचूक असायचे. त्यांची विनोदबुद्धीही तितकीच तल्लक होती. त्यांना इमरान खान यांनी तेव्हा पाकिस्तान व वेस्ट इंडिज मालिकेसाठी पंच म्हणून गेले होते. यावरून त्यांचा दर्जा सिद्ध होतो.
-दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार व माजी निवड समिती अध्यक्ष
रिपोर्टर हे खऱ्या अर्थाने जेंटलमन होते. ते सदैव हसतमुख असत आणि सर्व युवांना ते नेहमी प्रोत्साहन देत होते. मी खेळलेल्या अनेक सामन्यांना त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली. तसेच सर्व क्रिकेट वर्तुळात ते लोकप्रिय होते. ते त्यांचे काम चोखपणे पार पाडत असत
–विनय येडेकर, अभिनेता
रिपोर्टर यांच्या जाण्याने क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. ते आम्हा सर्वाचे गुरु होते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी पंचांच्या कामगिरीचा दर्जा सुधारला. ते नेहमी स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी उपलब्ध असायचे. त्यांचे क्रिकेटसाठीचे योगदान मोठे आहे. – गणेश अय्यर, माजी पंच ‘बीसीसीआय’