महापौर नरेश म्हस्के यांचे पालिका आयुक्तांना पत्र
ठाणे : दिवा येथील एमएमआरडीच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील सदनिकांच्या घोटाळय़ाप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, असे पत्र ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांना दिले आहे. यापूर्वी बीएसयूपी योजनेतील घरांमधील बेकायदा वास्तव्याचे प्रकरम्ण उघडकीस आल्यानंतर त्याची चौकशी लावण्यात आली होती. मुंब्रा पोलिसांपर्यंत मर्यादित राहिलेल्या या प्रकरणाच्या मुळाशी महापालिकेने जायला हवे, असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे.
दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्व योजनेतील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी इम्रान जुनेजा ऊर्फ मुन्ना र्मचट याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. हा घोटाळा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणात महापालिकेतील एक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणामुळे महापालिकेची सर्वत्र बदनामी होऊ लागली असून त्याची दखल घेत महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसे पत्रही त्यांनी आयुक्त डॉ. शर्मा यांना दिले आहे.
या घोटाळय़ासाठी बोगस बायोमेट्रिक सव्र्हे, बनावट संगणक चाव्यांचा घोळ, खोटे दस्ताऐवज, खोटी ताबा पावती असे दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. प्रकल्पबाधितांना सदनिका देण्याऐवजी इतर नागरिकांना मनमानी प्रकारे सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत असून, पर्यायाने लोकप्रतिनिधींची बदनामी होत आहे. महापालिकेच्या वास्तूंचा अशा प्रकारे गैरवापर होत असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे, असे म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेस उपलब्ध झालेल्या एकूण सदनिका, त्यांचे ठिकाण आणि उपलब्ध सदनिका कोणत्या प्रकल्पबाधितांना देण्यात आल्या आहेत, याची संपूर्ण लेखी माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.