Bhiwandi accident, metro ठाणे : भिवंडी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माण कामादरम्यान ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रिक्षात लोखंडी सळई शिरुन गंभीर जखमी झालेला प्रवाशाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याघटनेचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामा दरम्यान ३० जुलैला मोटारीवर राॅड पडला होता. या घटनेत वाहन चालक थोडक्यात बचावला. याच भागात २ मे या दिवशी देखील असाच प्रकार उघड झाला होता. एका मोटारीवर क्रेनचा भाग कोसळला होता. त्यापाठोपाठ आता, भिवंडीत देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे.

भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील धामणकर नाका परिसरात मेट्रो स्थानक उभारले जात आहे. दरम्यान, येथील स्थानकाखाली शेअर रिक्षाने तरुण प्रवास करत होता. त्याचवेळी धामणकर नाका मेट्रो स्थानकाचे काम सुरु असताना तेथील लोखंडी राॅड रिक्षात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात शिरला.

सोनू अली रमजान अली शेख (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने रिक्षातून प्रवास करत होता. भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी रिक्षातून प्रवास करताना सोनू अली याच्या डोक्यात लोखंडी सळई शिरली. या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोनूवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच राॅड आत गेल्याचेही डाॅक्टर म्हणाले. त्याच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली.

परंतू, सोनू अद्याप शुद्धीवर आला नसून त्याची प्रकृती चिंताजन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नसल्याची माहिती एका पोलिस अधिकारी यांनी दिली.