कल्याण : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील एका विकासकाकडून आठ कोटीची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एक वाद्ग्रस्त ज्येष्ठ पालिका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. या अधिकाऱ्याच्या मंत्रालयात नगरविकास विभाग, पालिका आयुक्तांकडे अनेक प्रकारच्या तक्रारी पडून आहेत.

पालिकेतील वाद्ग्रस्त श्रेणीतील या ज्येष्ठ अधिकाऱ्याची संपूर्ण प्रशासकीय कारकीर्द लाचखोरी, टक्केवारी, अरेरावीची असल्याने हाच अधिकारी या खंडणी प्रकरणात असण्याची शक्यता विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी या ज्येष्ठ अधिकाऱ्याची एका जागरूक नागरिकाने पालिका आयुक्तांकडे बेकायदा बांधकाम प्रकरणातील सहभाग प्रकरणी तक्रार केली आहे. २७ गाव भागातील अनेक विकासक या अधिकाऱ्याचा या प्रकरणातील सहभाग नक्की असल्याचे सांगतात. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विद्या विश्वनाथ म्हात्रे, तहसीलदार कार्यालयात शिपाई असलेला तिचा पती विश्वनाथ आणि त्यांचे कुटुंबीय या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत. नांदिवलीतील तक्रारदार विकासकांकडून आरोपींनी पाच कोटीची रक्कम धनादेशाने आणि उर्वरित रक्कम रोख स्वरुपात स्वीकारली आहे, असे फौजदारी तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वी मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात कारवाई का केली नाही, असा प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास विष्णुनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत आहेत. फरार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. जामीन फेटाळले तर आरोपींच्या अटकेची कारवाई तातडीने करता येईल, असे विष्णुनगरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. खंडणीतील काही रक्कम महागडी गाडी किंवा रोख रक्कम स्वरुपात या पालिका अधिकाऱ्याने स्वाकारली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपीच्या अटकेनंतर खरा प्रकार उघड होईल असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.