ठाणे – सिंधुदुर्ग ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकातील चहा विक्रेत्यांकडून मापात पाप करत निम्म्याहून कमी चहाची विक्री झाल्याचे प्रकार नुकतेच समोर आले होते. या चहा विक्रेत्यांवर जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाकडून कारवाई करत न्यायालयीन खटला देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर याच पद्धतीने ग्राहकांची वजनात फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले. याचीच दाखल घेत ग्राहकांना त्याच्या तक्रारी थेट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात यासाठी जिल्हा वैधमापन विभागाकडून जनता दरबार उपक्रम हाती घेण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

वैध माप व वजन याबाबत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने विविध कायदे व नियम लागू केले आहेत. वैध नियमन २००९ आणि त्याअंतर्गत नियमांनुसार व्यापारी तसेच औद्योगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजने, मापे यांची वैधमापन शास्त्र विभागाकडून तपासणी करण्यात येते. मात्र, अजूनही अनेक व्यवसायिक ग्राहकांची अनभिज्ञता, गोंधळाचा फायदा घेत वजन व मापात फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी ग्राहकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल करणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे ग्राहकांच्या हक्कांना बळ मिळणार असून, अशा गैरप्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हा पहिला जनता दरबार भरविण्यात येईल. ग्राहकांना यावेळी त्यांच्या अनुभवांची, त्रासांची माहिती देण्याची संधी मिळणार असून, तत्काळ चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास वैधमापन शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठवडी बाजारात दगड, फरशीच्या तुकडयाचा उपयोग होत असल्यास, आठवडा बाजाराचा तपशिल किंवा भाजी मंडईचे ठिकाण संबंधीत स्थानिक निरीक्षक, जिल्हयाचे उपनियंत्रक, मा. सह नियंत्रक अथवा मा. नियंत्रक कार्यालयास जागो ग्राहक जागो यांच्या संकेतस्थळावर (NCH) टोल फी किंवा दूरध्वनी क्र. १८००-११-४०००१ किंवा १४४०४ वर, तक्रार दाखल करता येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वस्तू वजन मापात कमी देणे, आवेष्टित वस्तुंची छापिल किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे अथवा व्यापा-यांकडील वजने काटे विहित मुदतीत पडताळणी न केल्यास किंवा अप्रमाणित वजने व मापे वापरल्यास संबंधितांविरुध्द कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.- राम राठोड, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, ठाणे