बदलापूर: देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवात पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती. याच जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकतेच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते. त्यानंतर झालेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जिजाऊ संघटना ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य l, शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचली आहे. संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हेही कोकणात एक वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी नीलेश सांबरे यांचे राजकीय वर्तुळात चांगले वजन आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उठबस आहे. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत.

त्यामुळे नीलेश सांबरे यांनी राजकीय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले. गेल्या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संघटनेचे उमेदवार आणि त्यांनी स्वतः मोठा प्रभाव पाडला. निलेश सांबरे स्वतः भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भिवंडी तालुका आणि शहापूर तालुक्यात लक्षणीय मते घेतली. त्यांना एकूण २ लाख ३१ हजार मते मिळाली. कुणबी समाजाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यात सांबरे यशस्वी झाल्याचे बोलले जाते. या मतांमुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. धक्कादायक म्हणजे सांबरे पराभूत झाले असले तरी शहापूर विधानसभा मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. तर मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यांना लक्षणीय मते मिळाली. कपिल पाटील यांचा ६६ हजार मतांनी पराभव झाला होता.

सांबरे यांचे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याशी असलेले संबंधही सर्वश्रुत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे एका ठिकाणी भाजपचेच उमेदवार कपिल पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले सांबरे विधानसभेला मात्र किसन कथोरे यांना पाठिंबा देत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजकीय क्षेत्रात अशा मोठ्या दबाव गटाचे नेतृत्व करणारे नीलेश सांबरे अखेर राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात गुरुवारी प्रवेश करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांबरे यांच्या समर्थकांनी याबाबतची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. १२ जून २०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ७ वाजता, कियारा बँक्वेट हॉल भू-मजला, अशर आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम येथे हा पक्ष प्रवेश करत सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. सोबतच भविष्यात शिवसेना पक्ष आणि जिजाऊ संस्था/संघटना हे एकत्रितरित्या कोकणात सामाजिक आणि राजकीय घडामोडीचा एक भाग असणार आहेत, असे समर्थकांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात या पक्ष प्रवेशाकडे वेगळ्या प्रकारे पाहिले जाते आहे.