ठाणे : मैत्रीत वितृष्ट आल्याने पंधरा ते सोळा वर्षांपुर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघे उपवन फेस्टीवलनंतर तुळजाभवानी मंदिरातील मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्ताने एका व्यासपीठावर आल्याचे दिसून आले. यावेळी मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आमच्या दोघांचे पक्ष जरी वेगळा असले तरी आमची मैत्री अबाधित राहू दे, असेच मागणे तुळजाभवानी देवीकडे मागितल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने काही वर्षांपुर्वी दुरावलेले जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईकांची गट्टी जमल्याचे चित्र दिसून आले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याने ते एकमेकांपासून दुरावले होते. सरनाईक यांनी आव्हाड यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर ते ओवळा-माजिवडा मतदार संघातून शिवसेनेचे आमदार झाले. तर, कळवा-मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड झाले. हे दोघे मित्र एकमेकांशी बोलतही नव्हते. इतके त्यांच्यात वितुष्ट आले होते. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवल आयोजित केला होता. या फेस्टीवलचे आमंत्रण सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले होते. ते स्विकारत आव्हाड यांनी या फेस्टिवलला उपस्थिती लावली होती. यानिमित्ताने मैत्रीत वितृष्ट आल्याने पंधरा ते सोळा वर्षांपुर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघे मित्र एकाच व्यापसीठावर आल्याचे दिसून आले. या व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधताना आव्हाड आणि सरनाईक या दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांची स्तुती केली. त्यापाठोपाठ बुधवारी हे दोन्ही मित्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसून आले.

ठाण्याच्या पाचपखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. याठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उपस्थिती लावून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आवठणींना उजाळा दिला. जितेंद्र आव्हाड आणि माझा पक्ष जरी वेगळा असला तरी आमची मैत्री अबाधित राहू दे, असेच मागणे तुळजाभवानी देवीकडे मागितले आहे. आम्ही दोघांनी आमचे कौटुंबिक संबंध गेले ४० वर्षे जपले आहेत. मी आणि जितेंद्र आव्हाड जवळपास नऊ वर्षे बोलत नव्हतो. पण आमचे कौटुंबिक संबंध आणि घरची नाती मात्र कायम ठेवली होती. तेच आयुष्यभर राहू दे, अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो, असेही सरनाईक म्हणाले.

मला सर्वोच्च पद मिळाले पण…

मी जितेंद्र आव्हाड यांना ३५ वर्षांपासून ओळखतो. ते सिद्धी विनायक आणि दादरमधील एका मंदीरात जातात. तसेच त्यांच्या मनात इच्छा असेल तर, ते तुळजापुरला जातात. या मंदीरातील चिंतामणी दगडावर हात ठेवून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक इच्छा मागितल्या होत्या आणि त्यांच्या सर्व इ्च्छा पुर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मी सुद्धा इच्छा मागितली होती. आपली ही इच्छा पूर्ण झाली आहे, असे सरनाईक म्हणाले. मला सर्वोच्च पद मिळाले पण, आव्हाड यांच्या काही इच्छा असतील तर ते मागतील. पण, मित्र म्हणुन मी देखील त्यांच्यासाठी देवीकडे मागेन, असे सांगत आव्हाड यांच्याशी असलेली मैत्री किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा सरनाईकांनी दाखवून दिले.