Election Commission News : ठाणे : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाविरोधात पत्रकार परिषद घेतली. यानंतर निवडणुक आयोगाविरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्याचबरोबर विरोधी पक्षांकडून टिका होत आहे. असे असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करत निवडणुक आयोगाचा निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी निवडणुक आयोगासह भाजपवर टिका केली.

लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे सप्रमाण लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. तसेच, नवी दिल्ली येथे सोमवारी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच अनुषंगाने सोमवारी ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी, ” निवडणूक आयोग चोर है, वोट चोर … गद्दी छोड, पहले लढे थे गोरो से… अब लडेंगे वोटचोरोसे, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच, निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह जाळले. यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे शक्य आहे का ?

या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुक आयोगासह भाजपवर टिका केली. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. ८५ वर्षांचे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे. निवडणूक आयोगाने एकाच घरात विविध जाती धर्माचे ८० लोक रहात असल्याचे दाखविले आहे. एका माणसाला ४३ अपत्यांचा पिता दाखविले आहे. हे शक्य आहे का, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

मतांची चोरी केली

निवडणूक आयुक्त नेमताना सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती असावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सरन्यायाधीशांना बाहेर काढले. त्यातूनच राजीव हे आयुक्त झाले अन् त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदल घडवून पक्ष चोरांना पंखाखाली घेतले. लोकसभा निवडणुकीत लाखो बोगस मतदार दाखवून मतदानाच्या शेवटच्या तासात १५ टक्के मतदार वाढविले. अशी टक्केवारी वाढवूनच मतचोरी केली आहे, अशी टिका आव्हाड यांनी केली. निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचे वाटोळे केले आहे. भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले. नंतर मतांची चोरी केली, असा आरोपही आव्हाड यांनी केला.