ठाणे : जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १९८७ च्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले असून या प्रकरणी राज्यातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेला इशारा दिला आहे.

नगरविकास विभाग-१० च्या २२ एप्रिल १९८७ च्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवेदनाप्रमाणे कल्याण डोंंबिवली पालिकेचे तत्कालीन प्रशासक शिवलिंंग भोसले यांनी १९ डिसेंबर १९८८ मध्ये गांंधी जयंती, महावीर जयंती, सवंत्सरी, १५ ऑगस्ट, गणेश चतुर्थी, साधु वासवानी जन्म दिवस (२५ नोव्हेंबर) यादिवशी कल्याण, डोंबिवलीतील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पालिकेत प्रशासकीय राजवट होती. या निर्णयाच्या आधारे परवाना विभागाच्या उपायु्क्त कांचन गायकवाड यांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस- मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

निर्णयास विरोध

पालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावरून शहरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचबरोबर राज्यभर विविध क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी यासंदर्भात एक निवेदन आयुक्तांना सोमवारी दिले. या पत्रात पालिकेने १५ ऑगस्ट रोजी शहरातील मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा, पालिका मुख्यालयासमोर मटण मांस विक्री करणारे विक्रेते, कत्तलखाने चालक यांच्यासह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

खाण्यावर नव्हे तर विक्रीवर बंदी

राज्यभरातून टीका होऊ लागल्याने पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी पत्रकार घेतली. शहरात मटण, मांस खाण्यावर नाही तर विक्रीवर बंदी आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानिमित्ताने त्यांनी प्रशासन आपल्या बंदीच्या निर्णयावर ठाम असल्याचे दाखवून दिले.

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी टीका केली आहे. तसेच हा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फक्त वाद पेटविण्यासाठी असे विषय सत्ताधाऱ्यांकडून उकरून काढले जातात. १५ ऑगस्टला मी मटण पार्टी ठेवणार आहे, कोण मला अडवणार, असा इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे.