ठाणे : Tuljabhavani temple महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे मंदीर ओळखले जाते. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध असून ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. या मंदिरात पाणी गळती होत आहे. त्यामुळे मंदीराचा गाभारा पाडण्यात येत आहे. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी नुकतेच तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन गाभारा पडण्यास विरोध केला आणि या प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे. हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे, ते नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे.

याविरोधात तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन भाविकांच्या याबाबत जनजागृती केली….सोबतच आई तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले, अशी पोस्ट आव्हाड यांनी मंदिर भेटीनंतर सोशल मीडियावर टाकली होती. त्यापाठोपाठ त्यांनी आता आणखी एक पोस्ट टाकली आहे.

इतिहासाचा खून तोही..

इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत ! तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास.

पहिली रचना अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे. पण आता “विकास” या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

मंदिर नवं होईल, पण

इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार, विकास म्हणजे वारसा संपवणं नाही. छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे तर ती संस्कृतीवरची तोडफोड आहे. आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो. उद्या कदाचित सांगावं लागेल, इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आता आवाज उठवा

आता आवाज उठवा. ही फक्त वास्तू नाही तर हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे. मंदिर वाचवण्यासाठी, ही पोस्ट शेअर करा. #SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.