Jitendra Awhad news : ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सात नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेने आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत त्यांना धक्का दिला होता. असे असतानाच, जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा नेत्याच्या वाढदिवसाला हजेरी लावत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळत हा इतरांसारखा गद्दार नाही, असे म्हणत पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांना टोला लगावला.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आहे. कळवा, मुंब्रा येथे राष्ट्रवादीची ताकद होती. महापालिका निवडणूकीत या भागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येत होते. काही दिवसांपूर्वीच आव्हाड यांच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या कळवा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळव्यात आव्हाडांना मोठा धक्का बसला होता. शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली होती.
जितेंद्र आव्हाड आमदार असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात भाजपची अवस्था अगदीच तोळामासा आहे. हा मतदारसंघ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे बहुसंख्य नगरसेवक आपल्या पक्षात कसे येतील यासाठी पद्धतशीर व्युहरचना डाॅ.श्रीकांत आखत होते. ही घडामोड सुरु असताना भाजपनेही या मतदारसंघातील आव्हाड समर्थक नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, यात शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली होती.
आव्हाडांची साथ नगरसेवक
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक मिलिंद पाटील, त्यांची पत्नी मनाली पाटील, माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, महेश साळवी, त्यांच्या पत्नी मनिषा साळवी, सुरेखा पाटील, सचिन म्हात्रे यांच्यासह मंदार केणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत अजित पवार आणि भाजपालाही आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे यांनी सूचक असा संदेश दिला होता.
या नेत्यावर आव्हाडांची स्तुतीसुमने
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले आणि सध्याचे शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा नेते मंदार केणी यांच्या वाढदिवसाला जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी आणि कळव्यातील दिवंगत ज्येष्ठ माजी नगरसेवक मुकुंद केणी यांचे ते पुत्र आहेत. कळव्यातील ते युवा नेतृत्व आणि उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. मंदार हे यापूर्वी राष्ट्रवादीचे ठाणे शहर युवक अध्यक्ष होते,
हा इतरांसारखा गद्दार नाही, कारण..
जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले,” मंदार केणी आणि माझी मैत्री कायम आहे आणि आमच्या मैत्रीच्या संबंधात दुरावा निर्माण झालेला नाही. कारण, मैत्री निखळ आणि स्वच्छ असली की त्यात दुरावा येत नाही. मंदार हा स्पष्ट होता, तो इतरांसारखा गद्दार नव्हता. त्याने माझ्यासोबत राहून आतून कलकांडया केल्या नाहीत. तो खासदार श्रीकांत शिंदे यांचा मित्र होता, तरी त्याने माझ्याशी कधीही गद्दारी केली नाही आणि श्रीकांत शिंदे यांनाही माहीत होते की, तो माझ्याजवळच्या पैकी एक आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, पक्ष सोडतानाही तो मला सांगून गेला.
ही माझ्या आयुष्यामधील मोठी चूक
केणी परिवाराला दूर ठेवले आणि दुसऱ्या परिवाराला जवळ ठेवले आणि त्यांकग्यावर अतिविश्वास ठेवला. ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. हा परिवार मला नेहमीच केणी कुटुंबाबाबत काहींना काही सांगायचा. त्यांच्यावर कारवाई कशी करता येईल, हेहै सांगायचा. पण, राजकारणात असे करायचे नसते. साथ द्यायची असेल तर ती मरणापर्यंत द्यायची. मनोहर साळवी यांच्याबद्दल मला आदर आहे आणि आज, उद्याही तो राहील. मंदार केणी हा सुद्धा माझ्या जवळचा होता आणि उद्याही राहील. पण, ज्यांनी माझ्याजवळ राहून जवळ असल्याचे नाटक करून गळा दाबला, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, असे आव्हाड म्हणाले.