वसई सत्र न्यायालयातील प्रकाराने खळबळ

वसईच्या सत्र न्यायालयातील न्याय़ाधीशांच्या दालनालाच एका अज्ञात व्यक्तीने कुलूप ठोकल्याचा प्रकार घडला. यामुळे न्यायालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी  अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरूवारी दुपारी वसई सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि कर्मचारी नेहमीप्रमाणे जेवणासाठी गेले होते.  सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)  एस.बी. पवार जेवण करून परत आल्यानंतर त्यांच्या दालनाता कुलूप असल्याचे आढळले. या कुलूपाला बरोबर एक चिठ्ठी लावण्यात आली होती. इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये अभिनेता सलमान खानला तीन तासांत जामीन मिळतो, मग मी कर भरत असतानाही मला न्याय का नाही अशा आशयाचा मजकूर होता. या चिठ्ठीखाली डॉ. फैय्याज खान असे नाव लिहण्यात आले होते.

या  घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर बुकळे यांनी दिली.