डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची छळवणूक करीत असल्याची तक्रार ३७ कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंकडे केली होती. या तक्रारींची दखल घेऊन विद्यापीठाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी सोमवारी पेंढरकर महाविद्यालयात आले होते. त्यांनी महाविद्यालयात संस्था अध्यक्ष देसाई यांची साडेतीन तास कसून चौकशी केली.  
‘समितीला महाविद्यालयात कोणी पाठवले. या समितीला अधिकार काय आहेत,’ असे प्रश्न उपस्थित करून सुरुवातीला त्रिसदस्यीय समितीला देसाई यांनी गांगरून टाकण्याचा प्रयत्न केला.
गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षांच्या मनमानी विरोधात महाविद्यालय कर्मचारी विविध स्तरावर तक्रारी करीत आहेत. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीत डॉ. एम. एस. निकम, डॉ. अनुपमा सावंत आणि डॉ. देशमुख यांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी प्रभाकर देसाई डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय केले जात आहेत. कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा देण्यात येत नाहीत. हक्काची रजा घेतली तर पगार कापण्यात येतो. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या नस्ती रखडून ठेवणे, कर्मचाऱ्यांवर कामचुकारपणाचा ठपका ठेऊन त्यांना कामावरून काढून टाकण्याचा सतत इशारा देणे, अशा अनेक तक्रारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यपाल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कुलगुरू राजून वेळुकर यांच्याकडे केल्या आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव खान यांनी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब त्रिभुवन, काही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून  महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आश्वासन कुलसचिवांनी दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तक्रारींच्या अनुषंगानेच चौकशी’
अध्यक्षांची साडेतीन तास आम्ही चौकशी केली. समिती व आमच्या अधिकारावर त्यांनी आक्षेप घेतला. विद्यापाठीने चौकशीसाठी पाठवले आहे. काही असेल ते विद्यापीठाला सांगा. आम्ही चौकशी करूनच जाणार आहोत, असे अध्यक्षांना सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या मुद्दय़ांची चौकशी केली असल्याची माहिती समिती सदस्या डॉ. एम. एम. निकम यांनी दिली.

संलग्नता रद्द करण्याची मागणी
जे अध्यक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, ते तेथील शिक्षक, कर्मचाऱ्यांशी कसे वागत असतील याची कल्पना येते. मालक असल्याच्या थाटात देसाई वागत आहेत. देसाई विद्यापीठ, अधिसभा सदस्यांना उलटसुलट पत्र पाठवत असतात. ही मालकशाही मोडून काढण्यासाठी या महाविद्यालयाची विद्यापीठाशी असलेली संलग्नता रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. वसंत शेकडे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K v pendharkar college president prabhakar desai face enquiry against staff harassment
First published on: 19-02-2015 at 12:03 IST