ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला असून पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. या पुरामुळे अद्यापही कल्याण व टिटवाळा शहराशी १५ गावांचा संपर्क तुटला आहे. काळू नदीला पूर आल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, शनिवार, रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी इथल्या चाकरमान्यांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार-पाच दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. भात लागवडीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने बळीराजा सुखावला आसला तरी चाकरमान्यांचे व इतर नागरिकांनाचे मात्र हाल होत आहेत. या पावसामुळे काळू नदीवर असलेला पुल पाण्याखाली गेला असून १२ ते १५ गावांचा कल्याण आणि टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, ठाणे शहरासह अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातही पावसाची अधूनमधून जोरदार इनिंग सुरूच आहे.

गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार सुरवात केली. शुक्रवार रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रूंदे गावाजवळील काळू नदीला पूर आल्याने नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे लगतच्या रूंदे, फळेगांव, आंबिवली, दानबाव, मढ, उशीद, हाळ, पळसोली, आरेळा, भोंगळपाडा आदी १२ ते १५ गावांचा शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. सदर रस्ता हा टिटवाळा स्थानक, कल्याणहून मुरबाडमार्गे नगर हायवे तसेच वाशिंद पडघा मार्गे मुंबई-नाशिक या मुख्य महामार्गाला जोडतो. पावसाची संततधार आशीच सुरू राहिल्यास काळू नदीवरील पुल पाण्याखाली राहणार असल्याचे पुलाच्या अलीकडेच अडकून पडलेल्या लोकांमधून कळते.

संपर्क तुटलेल्या गावातील लोकांना पर्यायी रस्ता खडवली मार्गे पंधरा ते वीस किमीचा अंतर पार करून आपल्या घरी पोहचावे लागेल. परंतु ज्यांच्याकडे खाजगी वाहने असतील त्यांनाच या मार्गी आपल्या घरी पोहचता येईल. कारण खडवली-फळेगांव-उशीद ही एसटी बससेवा दोन वर्षापासून बंद आहे. तसेच या ठिकाणी रिक्षा वहातुक देखील कमी प्रमाणात आहे. याचा फटका या गावकऱ्यांना बसणार आहे. यामुळे बरेच नागरिक व शालेय विद्यार्थी पूलावरील पाणी खाली होण्याची वाट पाहत आहेत. असाच पाऊस सतत पडत राहीला तर हा पुल दोन दिवस खाली होणार नाही. या पुरा फटका येथील जावई पाडा लगत असलेल्या मोरवीला देखील बसला आहे. ही मोरवी ही पाण्याखाली गेली असून या ठिकाणी असलाली चाळींच्या वस्तीतील लोखांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून प्रवास करत आपल्या घरी जावे लागते. या संततधार कोसळणार्‍या पावसाचा फटका टिटवाळा येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या साकवाला देखिल बसण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी वापस या साकवातून वर चढत आहे. यामुळे साकवावर पाणी चढल्याने रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर ही वाहतुक ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalu river overflow during heavy rain in thane district 15 villages out of contacts
First published on: 15-07-2017 at 11:19 IST