कल्याण – आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या (सीसीएमपी) होमिओपॅथी डाॅक्टरांना ॲलोपॅथी उपचाराचा सराव करण्यास आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील नोंदणी करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण शाखेने गुरूवारी कल्याणमध्ये मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चात कल्याण शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सुमारे ५०० हून अधिक डाॅक्टर सहभागी झाले होते.

आधुनिक होमिओपॅथी डाॅक्टरांना ॲलोपॅथी सरावाची आणि त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास दिलेली परवानी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या कल्याण शाखेच्या डाॅक्टरांनी निषेध मोर्चाच्या माध्यमातून केली.

कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी २४ तास आपल्या रुग्ण उपचार सेवा बंद ठेवल्या आहेत. या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले. रुग्ण, नातेवाईक यांची आबाळ सुरू झाली आहे. ‘आयएमए’च्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, ‘या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा सर्व डाॅक्टरांनी पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील होमिओपॅथी डाॅक्टरांच्या नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे. आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार आहोत.’ तसेच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत भारतीय वैद्यकीय संघटनेचे राज्य शाखेचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचे डाॅ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण मधील आयएमएच्या डॉक्टरांनी मुरबाड रस्ता येथील आयएमए सभागृह ते कल्याण तहसील कार्यालय आणि तेथून कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालय असा निषेध मोर्चा काढला. डॉक्टरांच्या या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि पालिका आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी ‘आयएमए’ कल्याण अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. तन्वी शहा, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. गोडबोले, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. विवेक भोसले, डॉ.विद्या ठाकूर, डॉ.प्रशांत खताळे, डॉ. विकास सुरंजे, डॉ. संदेश रोठे, यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते.