कल्याण – कल्याण मधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीच्या उमेदवारांंनी वर्चस्व प्रस्थापित केल्यावर या बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक रवींद्र घोडविंदे यांची तर, भाजपचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बाजार समितीच्या १८ जागांपैकी १६ जागांंवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत मुरबाडचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि यापूर्वी आपल्या विरूध्द पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्या, निष्क्रिय सदस्यांना दणका देण्याची व्यूहरचना आमदार कथोरे समर्थकांनी आखली होती. त्याप्रमाणे कुरघोड्या करणाऱ्यांना पराभूत करून महायुतीच्या उमेदवारांनी कल्याण बाजार समितीवर आपले वर्चस्व राखले. या निवडणुकीत काँग्रेसचा एक, एक अपक्ष उमेदवार निवडून आला.

या निवडणुकीच्या माध्यमातून कल्याण तालुक्यावर आपली मजबूत पकड असल्याचे आमदार किसन कथोरे आणि सभापती घोडविंदे यांनी दाखवून दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल जाधवर यांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवारांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे घोडविंदे, पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र घोडविंदे यांनी यापूर्वीही बाजार समितीचे सभापती पद भूषविले आहे. यापूर्वी त्यांनी बाजार समितीमधील विकास कामे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला होता. यामधील बहुतांशी कामे त्यांनी आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात मार्गी लावली होती.

सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले सभापती रवींंद्र घोडविंदे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ग्रामीण, आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. महाविद्यालयात विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवित आहेत.

जालिंदर पाटील हे भाजपचे २७ गाव गोळवली भागातील माजी नगरसेवक आहेत. यापूर्वीही ते बाजार समिती संचालक मंडळावर होते. बाजार समितीत लोकनियुक्त संचालक मंडळाने नसल्याने शासनाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय राजवटीविषयी बाजार समितीशी संबंधित शेतकरी, व्यापारी, लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या. त्यामुळे कल्याण बाजार समितीची निवडणूक लवकर घेण्याची मागणी विविध गटातून करण्यात येत होती. नोकर भरती, भूखंड उलाढाली अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. बाजार समितीत लोकनियुक्त राजवट सुरू झाल्याने शेतकरी, व्यापारी, अडते, ग्रामपंचायत अशा विविध गटांनी समाधान व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार समिती आवारातील रस्ते इतर पायाभूत सुविधा मार्गी लावणे, रखडलेले प्रकल्प पूर्ण करून घेणे याकडे आपण प्राधान्याने लक्ष देणार आहोत. बाजार समिती आवारातील कचरा समिती आवारात शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीचा महसूल वाढविणे, समिती कामकाज ऑनलाईन, संगणकीकृत करण्यावर भर देणार आहे. – रवींद्र घोडविंदे (सभापती, कल्याण बाजार समिती.)