कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. या बंदमध्ये बाजार समितीमधील सर्व व्यापारी, माथाडी संघटना सहभागी झाल्याने बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज नाशिक, अहिल्यानगर, जुन्नर, पुणे परिसरातून भाजीपाल्याचे सुमारे ४५० ट्रक येतात. फळांचे १५० ट्रक, फुलांचे २०० ट्रक येतात. याशिवाय विविध प्रकारचे धान्य वाहू सुमारे शंभरहून अधिक वाहने येतात.
बाजार समितीत बंद असल्याने पुरवठादार व्यापाऱ्यांनी बुधवारी बाजार समितीकडे पाठ फिरवली. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, कसारा, शहापूर, भिवंडी परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांना या बंदचा सर्वाधिक फटका बसला. बाजार समितीत दररोज सुमारे दीड कोटी रूपयांची उलाढाल होते.
बंदमधील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर ठाणे जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक डाॅ. किशोर मांडे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. बाजार समिती संचालक मंडळ निवडूक काळात आदर्श आचारसंहिता लागू होती. या कालावधीत प्रशासक डाॅ. मांडे यांनी बाजार समिती विकास आराखड्यातील पाच हजार चौरस मीटरचा सुविधा भूखंड घाईने दहा वर्षाच्या भाडेपट्ट्याने लक्ष्मी भाजी बाजारातील व्यापारी संघटनेला देण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीमधील व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता हा भाडेपट्टा करार करण्यात आला आहे. या जागेवर येणाऱ्या काळात कोणीही तात्पुरते, कायमस्वरुपी बांधकाम करून गाळे उभारणी केली तर बाजार समिती आवारातील वाहतुकीला त्याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. सर्व व्यापारी संघटनांचे म्हणणे ऐकून न घेता, संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी, मनमानी पध्दतीने हा भूखंड प्रशासकांनी भाडेपट्टा कराराने दिल्याने प्रशासकाच्या निषेधार्थ बुधवारी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदमध्ये फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघ, कल्याण कांदा, लसूण, बटाटा घाऊक विक्रेता संघटना, कल्याण फूल विक्रेता संघटना, कल्याण फळ विक्रेता संघटना, ओम शिवम जनकल्याण वेलफेअर संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. लोकनियुक्त संचालक मंडळ बाजार समितीवर आले तरी प्रशासक आपला कार्यभार समितीकडे सोपविण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.
शिळ्या भाज्या, फळांची विक्री बाजार समितीमधून बुधवारी सकाळी ताजी फळे, ताजा भाजीपाला न मिळाल्याने कल्याण, डोंबिवली परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी आपल्या जवळील जुना भाजीपाला, फळे घेऊन विक्री सुरू केली आहे., या भाजीपाल्यांचे दर विक्रेत्यांकडून चढे लावण्यात आले आहेत. वडापाव विक्रेत्यांना बटाटे उपलब्ध न झाल्याने त्यांची सर्वाधिक कोंडी झाली.
बाजार समितीवरील प्रशासकाच्या मनमानीच्या निषेधार्थ बाजार समितीमधील सर्व व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पाळला आहे. व्यापारी संघटनेला भूखंंड देण्यास कोणाचा विरोध नाही, फक्त तो देताना सर्व नियमांचे पालन व्हावे अशी संघटनांची अपेक्षा आहे. रवींद्र घोडविंदे सभापती, कल्याण बाजार समिती.