कल्याण : कल्याणमधील महापालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात रविवारी सायंकाळी ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकाचा प्रयोग सुरु झाल्यानंतर एका तासाने रंगमंचावरील प्रखर झोताच्या दिव्यांवर कीटक आल्याने काहीवेळासाठी नाट्यप्रयोग बंद करण्याची वेळ आली. कीटक नाशक फवारणीनंतर कीटकांचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर पुन्हा प्रयोग सुरू झाला.
गेल्या महिन्यात डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या छताचा प्लास्टर ऑफ पॅरीसचा लगदा कोसळल्याने हे नाट्यगृह बंद आहे. त्यामुळे या भागातील अनेक नाट्यप्रेमी कल्याण, ठाणे येथील नाट्यगृहांमध्ये जातात. रविवारी सायंकाळी ज्येष्ठ नाट्यकलाकार भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांच्या नाटकाचा प्रयोग कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यमंदिर येथे सायंकाळी साडे चार वाजता होता. नाट्य सभागृहातील विजेचे दिवे बंद करण्यात आले होते.
रसिक प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेत असताना पाच वाजल्यापासून किरकोळ प्रमाणात कीटक रंगमंचावरील प्रखर झोताच्या दिव्यांवर घोंघावू लागले. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अधिक संख्येने कीटकांचे थवे रंगमंचावरील प्रखर झोताच्या दिशेने आले. कीटकांच्या रंगमंचावरील या घुसखोरीमुळे नाट्य कलाकारांना रंगमंचावर भूमिका सादर करणे अवघड झाले. अखेर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भरत जाधव यांनी कीटकांचे प्रमाण कमी होईपर्यंत काही वेळ नाट्यप्रयोग बंद ठेवण्याचे जाहीर केले.
नाटक रंगात आले असताना नाट्य प्रयोगामध्ये कीटकांमुळे मध्येच खंड पडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक वर्ग कुटुंबीयांसह नाटकाला आला होता. सभागृहातील तिन्ही बाजुचे दरवाजे प्रेक्षकांच्या आत बाहेर जाण्याच्या हालचालींमुळे उघड बंद होतात. या कालावधीत हळूहळू कीटक नाट्यगृहात प्रवेश करतात. रंगमंचावर प्रखर झोताचा उजेड दिसला की सभागृहातील कीटक रंगमंच दिशेने जातात. त्यामुळे वेळच्या वेळी फवारणी खूप महत्वाची आहे, असे प्रेक्षकांनी सांगितले.
अत्रे रंगममंदिरात रविवारी नाट्यप्रयोग पाहत असताना रंगमंचावरील प्रखर झोत दिव्यांवर कीटक घोंगावत होते. काही वेळानंतर हे प्रमाण थव्याने वाढले. त्यामुळे नाट्यप्रयोग काही वेळ बंद ठेवावा लागला. नाट्य सभागृह, रंगमंचावर वेळच्या वेळी फवारणी होणे खूप गरजेचे आहे. – शैलेंद्र सज्जे, नाट्यरसिक.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रंगमंंचावरील प्रखर झोत दिव्यांवर कीटक आल्याने काही वेळ नाट्यप्रयोग बंद केला. कीटक नाशक फवारणीनंतर कीटकांचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर नाट्यप्रयोग पुन्हा सुरु झाला. नाट्य सभागृहात नियमित कीटकनाशक फवारणी केली जाते. – माणिक शिंदे, व्यवस्थापक, अत्रे नाट्यगृह.