कल्याण – सोमवारी रात्री कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका प्रवाशाच्या अंंगावर रिक्षा घालून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण पूर्वेतील नेतिवली भागातील एका रिक्षा चालकाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी प्रवाशाच्या तक्रारीवरून मंगळवारी सहा हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला. उपप्रादेशिक परिवहन विभागाने तत्परतेने आणि आक्रमकपणे केलेल्या या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधान तर रिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
प्रवाशांशी हुज्जत घातली आणि प्रवाशाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाकडे तक्रार केली तर दोन ते तीन दिवसांची प्रवासी भाड्यातून मिळालेली कमाई आरटीओ कार्यालयाकडे दंड म्हणून जमा करावी लागते, असा एक मजबूत संदेश या कारवाईच्या माध्यमातून रिक्षा चालकांमध्ये गेला आहे.
रूपेश केणे असे आरटीओ कल्याण कार्यालयाने दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षा मालकाचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील कल्याण शीळ रस्त्यावरील नेतिवली भागात राहतात. एका प्रवाशाने उपप्रादेशिक परिवहनच्या कल्याण कार्यालयात केलेल्या तक्रारीत म्हटले होते, की सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आपण कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडलो. रेल्वे स्थानकातून भिवंडी येथे जाण्यासाठी आपण रिक्षा बघत होतो. त्यावेळी एक रिक्षा चालक रस्त्याच्या विरूध्द मार्गिकेतून अचानक आपल्या अंगावर आला. आपण क्षणात बाजुला झालो नसतो तर रिक्षा चालकाने आपणास जखमी केले असते.
आपल्या अंगावर अचानक रिक्षा का आणली, असा प्रश्न प्रवाशाने रिक्षा चालकाला केला. उलट रिक्षा चालकाने तुम्हाला काही झाले नाही ना. झाले असते तर बघून घेतले असते, अशी अरेरावीची भाषा केली. प्रवासी आणि रिक्षा चालकाची बाचाबाची सुरू असताना इतर रिक्षा चालक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी प्रवाशाला उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. प्रवाशाने रिक्षा चालकांची हुल्लडबाजी पाहून तेथून काढता पाय घेतला. प्रवासी मुंबईत एका माध्यम कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
मंगळवारी सकाळी प्रवाशाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुळ यांना लेखी तक्रारीद्वारे रिक्षा चालकाची तक्रार केली. बारकुळ यांनी तातडीने मोटार वाहन निरीक्षकांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पाठवले. अधिकाऱ्यांनी या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालयात नेले. तेथे त्या रिक्षा चालकाला त्यांच्याबाबत आलेल्या उर्मट वागणुकीची माहिती देण्यात आली. रिक्षा मालक रूपेश केणे यांनी पीयुसीची प्रक्रिया पार पाडली नसल्याचे आढळले. या गुन्ह्याप्रकरणी प्रत्येकी दोन हजार रूपये, वाहनाचा विमा संपला होता. या गुन्ह्याप्रकरणी प्रत्येकी चार हजार रूपये, चालकाने प्रवाशाशी उध्दट वर्तन केले होते. म्हणून पाचशे रूपये दंड. मोटार वाहन कायद्याने या सर्व त्रृटींचा दंड म्हणून आरटीओ कार्यालयाने रूपेश केणे यांच्याकडून सहा हजार पाचशे रूपये दंड वसूल केला.
रिक्षा चालकांनी मोटार वाहन कायद्याचे नियम पाळून प्रवासी वाहतूक करावी. प्रवाशांशी उध्दट वर्तन करू नये. अन्यथा प्राप्त तक्रारीप्रमाणे तत्पर कारवाई केली जाईल. – आशुतोष बारकुळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.