Kalyan Crime कल्याण पूर्व भागात २३ डिसेंबरच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करुन तिचा मृतदेह बापगाव परिसरात फेकण्यात आला. या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं असता आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

विशाल गवळीने २३ डिसेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह २४ डिसेंबरला कल्याण जवळच्या बापगाव भागात आढळला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. ज्यानंतर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करण्यासाठी मूक मोर्चाही काढण्यात आला. त्याच प्रमाणे आज (२ जानेवारी २०२५) कल्याण मधील रहिवाशांनी मोर्चा काढला आणि सदर आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली.

या प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल गवळी फरार झाला होता. पोलिसांनी आधी त्याच्या पत्नीला अटक केली. त्यानंतर त्याला शेगावहून अटक करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे एमसीआरची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास अजून पूर्ण व्हायचा आहे असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात मृतदेह फेकण्यासाठी वापरलेली बॅग, मोबाइल सीम कार्ड हे जप्त करायचं आहे असंही पोलिसांनी सांगितलं. ज्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी ४ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

फिर्यादींचे वकील नीरज कुमार काय म्हणाले?

आरोपीच्या वकिलांनी तपास शिल्लक नसल्याने जामीन दिला जावा अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. तसंच आरोपीचे वकील यांनी बदलापूर प्रकरणासारखा आरोपीचा एन्काऊंटर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना संपर्कात राहू द्या अशी मागणी केली. मात्र आम्ही न्यायालयाला याबाबत नकार द्यावा अशी मागणी केली. कारण कायद्यात अशी कुठलीही तरतूद नाही. असं फिर्यादींचे वकील नीरज कुमार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींचे वकील काय म्हणाले?

आम्ही MCR साठी मागणी केली होती. आता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे. दरम्यान विशाल गवळीला फाशी देण्यात यावी यासाठी कल्याणच्या न्यायलयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी विशिष्ट फलक आंदोलकांनी हाती घेतले होते.