कल्याण : मोहने तसेच मोहिली उदंचन व जलशद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने ही दोन्ही केंद्रे मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बंद राहणार आहेत. या कालावधीत कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले.

महापालिका मोहने उदंचन केंद्र येथे उल्हास नदीतून कच्चे पाणी उचलते. हे पाणी उचलताना वाहिन्यांमध्ये गाळ, जलपर्णीसदृश्य वनस्पती येऊन अडकतात. त्यामुळे नदी पात्रातून पाणीउपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे गाळ काढणे, वाहिनी दुरुस्ती करण्याचे काम मंगळवारी केले जाणार आहे.

मोहिली उदंचन व जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब विद्युत रोहित्राची देखभाल दुरुस्ती करायची आहे. एकाचवेळी ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुद्धीकरणातून कल्याण शहर, ग्रामीण, डोंबिवली शहरी भागाला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.