कल्याण – शासनाच्या लाडक्या बहिणी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कल्याण, डोंबिवली परिसरातील महिला बचत गटांना त्यांच्या मानधनाचे पैसे दीड वर्ष होत आले तरी शासनाकडून न मिळाल्याने महिला बचत गटातील महिला सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हेच काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र मानधन देण्यात येत आहे. मग महिला बचत गटांवर अन्याय का केला जात आहे, असे प्रश्न महिला बचत गटाच्या सदस्या करत आहेत.

गेल्या वर्षी शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. दरमहा महिलांना दीड हजार रूपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनांची अंमलबजावणी करायची असल्याने शासन अधिकाऱ्यांबरोबर सरकारने महिला बचत गटाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, काही सामाजिक संस्था यांना लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्याची कामे दिली. एका अर्जामागे ५० रूपये देण्याचे आश्वासन शासनातर्फे महिला बचत गट आणि संबंधितांना दिले होते. बसल्या जागी काम मिळाले म्हणून कल्याण डोंबिवली भागातील अनेक महिला बचत गटांनी आपल्या भागातील महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम घेतले.

कल्याण डोंबिवली पालिका महिला आणि बाल विकासाच्या माध्यमातून ही कामे महिलांना करण्याचे निर्देश देण्यात आले. महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी एका अर्जामागे ५० रूपये मिळतील या आशेने अधिकाधिका लाभार्थी महिलांचे अर्ज भरून देण्याचे आव्हान स्वीकारले. हे ऑनलाईन अर्ज भरताना महिलांनी स्वताचा मोबाईल वापरला. त्यामधील रिचार्जचे पैसे स्वता भरले. लाडक्या बहिणींचे अर्ज भरताना शासनाचा सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडथळे येत होते.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्यभरातून महिलांची झुंबड उडाली. त्यामुळे लाडक्या बहिणींचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ दिवसा खुले होत नव्हते. अनेक वेळा हे संकेतस्थळ रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरळीत चालत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिवसा लाभार्थी महिलांची विविध भागात जाऊन माहिती संकलन करायचे आणि रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत जागून लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरण्याचे काम केले.

ही कामे देणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या महिला व बाल विकास, समाज कल्याण विभागात फेऱ्या मारून आम्ही थकलो आहोत. याच विभागातील अधिकाऱ्यांनी ही कामे करण्याचे आदेश दिले होते. या विभागातील अधिकारी आता तुम्हाला शासन पैसे देईल असे सांगत जबाबदारी झटकत आहेत महिला बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले.

लाडक्या बहिण योजनेचे अर्ज आम्ही दिवस, रात्र कामे करून ऑनलाईन माध्यमातून भरले. यासाठी व्यक्तिगत मोबाईल, रिचार्ज खर्च आम्ही केला. अर्जामागे ५० रूपये मानधन मिळणार असल्याने आम्ही बचत गटांनी ही कामे केली. आता आमच्या मानधनाचे पैसे देण्यात पालिका, शासन अधिकारी टाळाटाळ करत आहेत. – दर्शना पाटील, महिला बचत गट सदस्या, डोंबिवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचत गटाच्या सदस्यांची माहिती शासनाला पाठवली आहे. शासनाचा निधी आल्यानंतर बचत गटाच्या सदस्यांचे मानधन देण्यात येणार आहे. – प्रशांत गवाणकर, समाज विकास अधिकारी.