कल्याण : पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया असे विविध प्रकारचे साथआजार डोके वर काढतात. यासाठी प्रभागात वेळवेळच्या वेळी जंतुनाशक फवारणी झाली पाहिजे, नागरिकांना वैद्यकीय, आरोग्य सेवा दारात उपलब्ध झाली पाहिजे, हा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग हद्दीतील टिटवाळा परिसरातील मुख्य चौक, रस्त्यांमध्ये जंतूनाशक, धूर फवारणी, कीटकनाशक फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक असलेले फलक लावून नागरिकांना या कर्मचाऱ्यांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात अनेक वेळा झाडे, झुडपे, घर परिसरातील उघड्या गटारांमुळे, सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढते. हे डास परिसरातील रहिवाशांना त्रासदायक ठरतात. असे नागरिक पालिकेत संपर्क करतात. त्यांना काही वेळा प्रतिसाद मिळत नाही.

अ प्रभागातील टिटवाळा, बल्याणी, मांडा परिसरातील नागरिकांना आपल्या घर परिसरात डासांचा उपद्रव वाढत असल्याचे जाणवले तर त्यांना तात्काळ आपल्या प्रभागातील जंतूनाशक, धूर फवारणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला संपर्क साधता यावा म्हणून टिटवाळ्यातील चौकातील फलकांवर त्या कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक फलकांवर लावण्यात आले आहेत. कार्यालयीन वेळेत, अत्यावश्यक प्रसंगी हे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.

तसेच, प्रभागात साथ आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक नियमित प्रभागात जाऊन विभागवार घराघरात जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. घरात ताप, सर्दी, डोकेदुखी, अन्य काही आजाराचे रुग्ण आहेत का याची चाचपणी करणार आहेत.

नागरिकांच्या संपर्काची वाट न पाहता जंतूनाशक, धूर फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार लावून विभागवार फवारणी करण्याचे नियोजन करून देण्यात आले आहे. प्रभागात मलेरिया, डेंग्यु अन्य साथ आजारांचा प्रादुर्भाव होऊच नये यादृष्टीने अ प्रभागात नियोजन करण्यात आले आहे, असे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी अ प्रभाग हद्दीतून डास निर्मूलनासंदर्भात संपर्क केला तर त्याला नकार न देता कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी पोहचून त्या भागात जंतू, धूर फवारणी करायची आहे, असे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. घरांमध्ये साठवण केलेल्या पाण्यात डासांच्या अळया असतात. या अळ्या शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे. लोकाभिमुख प्रशासनाचा भाग म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळा सुरू आहे. प्रभागात कोठेही साथ आजाराने डोके वर काढू नये. नागरिकांना वेळेत त्यांच्या मागणीप्रमाणे वैद्यकीय, आरोग्य सेवा मिळावी या उद्देशातून हा एक लोकाभिमुख पथदर्शी प्रकल्प टिटवाळा प्रभागात राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.