कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकूण ५१३ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १७६ इमारती अतिधोकादायक आहेत. या सर्व धोकादायक इमारतींना महिनाभराच्या कालावधीत पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. कल्याण पूर्वेत चिकणीपाडा येथे श्री सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये ५१३ धोकादायक इमारती आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींना अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. या नोटिसीनंतर इमारत मालक धोकादायक इमारत रिकामी करत नाही की तेथील रहिवासी पालिकेची नोटीस आली म्हणून घरे खाली करत नाहीत.
मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर अशा धोकादायक इमारतीमधील एखादी इमारत दरवर्षी पावसाळ्यात कोसळते. या इमारत दुर्घटनेनंतर पालिकेची काही दिवस धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम सुरू होते. १७६ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये रहिवास आहे. अशा इमारतींमधील रहिवासी आणि इमारत मालक यांचा भाडे, इमारत रिकामी करणे याविषयांवरून वाद सुरू असतात. काही वाद न्यायप्रविष्ट असतात. या वादामुळे अनेक वेळा इमारत मालक इमारतीची देखभाल करत नाहीत. रहिवाशांनी देखभाल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इमारत मालक हरकत घेतो. वर्षानुवर्षाच्या या वादामुळे इमारतीची देखभाल करण्यात आली नाहीतर ती इमारत लवकरच धोकादायक बनते.
या वादामुळे इमारत मालक रहिवासी जागेचा हक्क सोडत नाही म्हणून ती इमारत धोकादायक होईल, पालिकेकडून तोडली जाईल किंवा पावसात कोसळेल याची वाट पाहतात. अशी इमारत एकदा कोसळली की मग इमारत मालक त्या जागेवर आपला हक्क दाखवून तेथील रहिवाशांना त्या जागेवर पाऊल ठेऊन देत नाहीत, असे प्रकार यापूर्वी डोंबिवली, कल्याणमध्ये घडले आहेत. इमारत धोकादायक झाली तरी अशा इमारतींमधील रहिवासी घराबाहेर पडण्यास तयार होत नसल्याचे सांगण्यात येते.
मागील २० वर्षापासून कल्याण, डोंबिवलीत बेकायदा इमारतींचे प्रमाण वाढले. या इमारती उभारताना भूमाफिया माती मिश्रित वाळू आणि त्यामध्ये दगडाची भुकटी (ग्रीट) वापरतात. या बांधकामात भूमाफियांकडून सिमेंटचा वापर केला जात नाही. बांधकामानंतर पुरेसे पाणी इमारत बांधकामावर मारले जात नाही. त्यामुळे पालिका हद्दीतील इमारती कमकुवत आणि लवकर धोकादायक होत असल्याचे नगर नियोजनातील एका जाणाकाराने सांगितले.
पालिका हद्दीत धोकादायक इमारती असल्या तरी काही इमारती या संरचनात्मक अभियंत्यांच्या पाहणीनंतर दुरुस्ती करून सुस्थितीत करता येतात. सी -एक पध्दतीच्या इमारती या अतिधोकादायक असतात. त्या इमारती निष्कासित करणे आवश्यक असते एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दहा प्रभाग हद्दीतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. अवधूत तावडे उपायुक्त,अतिक्रमण नियंत्रण विभाग.