कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असताना आपल्या मालकीचा डोंबिवलीतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज गृहसंकुलातील वास्तु सृष्टी इमारतीमधील गाळा पालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने देणाऱ्या मुख्य औषध मिश्रक अनिल शिरपूरकर (चीफ फार्मासिस्ट) यांच्यावर ऑफिस ऑफ प्राॅफिट कायद्याचा भंग केल्याने बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे सोमवारी केली.

हा गाळा भाड्याने घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांचीही याप्रकरणात चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी उपजिल्हाप्रमुख भगत यांनी केली आहे. याप्रकरणात पालिका प्रशासनाने संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आपण राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास प्रधान सचिव आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा भगत यांनी दिला आहे.

राहुल भगत यांनी तक्रारीत म्हटले आहे, की कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात अनिल शिरपूरकर हे मुख्य औषध मिश्रक आहेत. ते दरमहा पालिकेतून वेतन घेतात. कोणत्याही शासकीय, शासन संस्थेशी निगडित कर्मचाऱ्याने तो शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेचे वेतन घेत असेल तर त्याने पुन्हा त्याच शासन संस्थांमधून इतर कोणताही गैरआर्थिक लाभ घेऊ नये. असा महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमातील ऑफिस ऑफ प्राॅफिटचा नियम आहे. शिरपूरकर हे कडोंमपात नोकरी करत असताना त्यांनी डोंबिवलीतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज संकुलातील आपला गाळा पालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी भाड्याने दिला आहे. या माध्यमातून लाभार्थी शिरपूरकर यांना पालिका दरमहा एक लाखाचे भाडे देत आहे.

एकीकेड नोकरीच्या माध्यमातून वेतन आणि गाळ्याच्या माध्यमातून भाडे घेऊन शिरपूरकर पालिकेची आर्थिक फसवणूक आणि ऑफिस ऑफ प्राॅफिट कायद्याचा भंग करत आहेत, असे भगत यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्याने शिरपूरकर यांचा गाळा आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी निश्चित केला, तेही तितकेच याप्रकरणात दोषी आहेत. शिरपूरकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून याप्रकरणात इतर जे दोषी आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी भगत यांनी आयुक्त गोयल यांच्याकडे केली आहे.

हे प्रकरण उघडकीला येऊन दहा दिवस उलटले तरी पालिका प्रशासन, आरोग्य विभागाने शिरपूरकर यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासन शिरपूरकर यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. पालिकेने कारवाई केली नाहीतर याप्रकरणी शासनाकडे दाद मागणार आहोत, असे भगत सांगितले. अशाच प्रकरणात कडोंमपाने काही वर्षापूर्वी एक साहाय्यक आयुक्त आणि एक फार्मासिस्ट सेवेतून बडतर्फ केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाची चौकशी करत आहोत. ऑफिस ऑफ प्राॅफिट कायद्याचा शिरपूरकर यांनी भंग केला आहे का याची कायदेशीर माहिती घेत आहोत. याप्रकरणी चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. – प्रसाद बोरकर, उपायुक्त, आरोग्य विभाग.