कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेत विविध पदांवर ४९० उमेदवारांची नोकर भरती करण्यात येणार आहे. या नोकर भरतीसाठी सुमारे ५० हजाराहून अधिक अर्ज पालिका प्रशासनाकडे ऑनलाईन माध्यमातून दाखल झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या समन्वयाने आणि नियंत्रणाखाली टीसीएसकडून ही नोकर भरतीची परीक्षा पार पाडली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. या परीक्षचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र, विद्यार्थी सभागृह प्रवेश पत्र लवकरच पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आल्यानंतर पालिकेत विविध पदांसाठी दीड हजाराहून अधिक पदांची मेगाभरती करण्यात आली होती. त्यानंतर तीस वर्षानंतर ४९० पदांसाठी मेगाभरती होत आहे. पालिकेने सुमारे एक हजाराहून अधिक पदे भरण्याचे प्रस्तावित केले होते. परंतु, पालिका आयुक्तांनी आवश्यक पदे भरण्याचे सूचित केल्यानंतर प्रशासनाने केलेल्या छाननीमध्ये सुमारे ४५० पदे कमी झाली. त्यानंंतर आवश्यक श्रेणीतील ४९० पदे पालिकेने निश्चित केली.
गेल्या दोन महिन्यापूर्वी जूनमध्ये या नोकर भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर ३ जुलै रोजी परीक्षा शुल्कासह अर्ज भरण्याची अंतीम मुदत होती. ३ जुलै रोजीची मुदत १५ दिवसांनी इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी वाढविण्यात आली होती. या नोकर भरतीसाठी खुल्या गटासाठी एक हजार रूपये, मागास संवर्गासाठी ९०० रूपये परीक्षा शुल्क प्रस्तावित आहे. १५ जुलैपर्यंत पालिकेत सुमारे ऑनलाईन माध्यमातून सुमारे ५० हजाराहून अधिक इच्छुकांंचे विविध पदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.
१५ जुलैपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करणारे इच्छुक या नोकर भरती परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. नोकर भरती परीक्षेसाठी पदाप्रमाणे यापूर्वीच अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, बुध्दिमत्ता चाचणी निकषावर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र, परीक्षा सभागृह तिकीट उमेदवाराला महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या जाहिरातीमध्ये पालिकेच्या विविध विभागातील २१ संंवर्गांमधून ही पदे भरण्यात येत आहेत. प्रशासकीय सेवा, लेखा, वैद्यकीय, अग्निशमन, घनकचरा, विधी, अभियांत्रिकी, क्रीडा, उद्यान, भांडार अशा विविध संंवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. या नोकर भरतीमध्ये सर्वाधिक पदे वैद्यकीय विभागात ७८ परिचारिका, स्थापत्य कनिष्ठ अभियंता ५८, अग्निशामक १३८ पदे, लिपिक टंकलेखक ११६ पदे भरण्यात येणार आहेत.
या नोकर भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ निश्चित करण्यात आली आहे. खुल्या अमागास गटासाठी ३८, मागासवर्गिय, अनाथ आणि प्राविण्यप्राप्त खेळाडु गटासाठी ४३, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी ४५, स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार ४५, माजी सैनिक झालेली सेवा त्यात तीन वर्षाची वाढ, अंशकालीन उमेदवारांसाठी ५५ वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.