कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या दहा प्रभागांमधील मालमत्ता कर विभागातील कर्मचारी मालमत्ता कर लावण्यासाठी नागरिक, विकासक आणि मध्यस्थांना किरकोळ कारणे देऊन येरझऱ्या मारायला लावतात. प्रभागांमधील मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय ते नस्तीला हात लावत नाहीत. अन्यथा, किरकोळ कारणे देत नस्तीमध्ये त्रृटी काढून फेऱ्या मारायला लावतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

प्रभागांमधील मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या या टंगळमंगळ कारभारामुळे प्रभागांमधील मालमत्ता कर विभागात कर लावण्याच्या नस्तींचे ढीग झाले आहेत. मालमत्ता कर हा पालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. सुमारे ३५० ते ४५० कोटीचा महसूल दरवर्षी मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत जमा होतो. हा कर वेळेत नियमित नागरिक, थकबाकीदार यांच्याकडून वसूल करावा. तसेच, इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला, भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींना विनाविलंब मालमत्ता कर लावून वसुली करण्यात यावी, अशा पालिका वरिष्ठांच्या कर विभागातील अधीक्षक, कर्मचाऱ्यांना सूचना आहेत.

मालमत्ता कर लावण्यासाठी नागरिक, विकासकाने प्रभागांमध्ये प्रस्ताव दाखल केला की नागरिक, विकासक हात ओले करत नाही म्हणून कर्मचारी या नस्ती दाबून ठेवतात. एखाद्या नागरिकाने रेटा लावला तर ती नस्ती बाहेर काढून त्यात किरकोळ त्रृट्या काढून मुद्दाम त्या नस्ती कर लावण्यासाठी प्रलंंबित ठेवतात. नागरिक, विकासकांना हेलपाटे मारण्यास लावतात. यापूर्वी एक मध्यस्थ तीन ते चार हजारात नागरिकांचे प्रभागांमध्ये कर लावून देण्याचे काम करत होता. आता त्याच कामासाठी कर्मचारी सहा ते सात हजार रूपये मागत असल्याच्या तक्रारी आहेत.

मालमत्ता कर उपायुक्त कांचन गायकवाड वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे प्रभागांमधून नियमित, थकित मालमत्ता कराची वसुली होईल यासाठी प्रयत्नशील आहेत. शहराच्या विविध भागात दोन महिन्यापूर्वी विशेष केंद्रे सुरू करून अशाप्रकारे वसुली करण्यासाठी कर विभागाने प्रयत्न केले. आता अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे प्रभागांमध्ये जाऊन मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेत आहेत. काही प्रभागांमध्ये मालमत्ता कर विभागात ठाण मांडून बसलेले कर्मचारी हे उद्योग करत असल्याच्या तक्रारी आहेत.

अलीकडेच डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात स्वामी नारायण सीटीतील लाईफस्पेस सोसायटीतील एका भागाला कर वरिष्ठ लिपिक नंदकिशोर राणे यांनी मालमत्ता कर लावला नव्हता. आयुक्त अभिनव गोयल यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच आयुक्तांनी राणे यांना तडकाफडकी निलंबित केले. असे ‘राणे’ पालिकेच्या काही प्रभागांमध्ये मालमत्ता कर विभागात आणि मुख्यालयात ठाण मांडून आहेत. हे ठाणमांडे त्या ठिकाणाहून हटविल्याशिवाय नागरिकांना वेळेत मालमत्ता कर लावून मिळणार नाही आणि पालिकेच्या महसुलात वाढ होणार नाही, असे नागरिक सांगतात. ज्या प्रभागात कर्तव्यकठोर साहाय्यक आयुक्त तेथे हे प्रकार बंद आहेत. पण, काही साहाय्यक आयुक्त कर विभागात वाढती ढवळाढवळ करून आकारणीची ‘गणिते’ ठरवत असल्याची चर्चा आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींना कर आकारणी सुरू आहे. मुख्यालयात दाखल मालमत्ता कर आकारणीसाठीचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर केले जात आहेत. कर आकारणीचे प्रस्ताव प्रलंबित ठेऊ नका अशा प्रभागांना सक्त सूचना आहेत. – कांचन गायकवाड, उपायुक्त, मालमत्ता कर.