कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत गंगाराम देगलुरकर आणि स्वच्छता निरीक्षक सुदर्शन शांताराम जाधव गुरूवारी पालिकेतील एका सफाई कामगाराकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकले. एकाच दिवशी पालिकेचे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने प्रशासनावर वरिष्ठांचा वचक आहे की नाही असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या दोघांच्या अटकेने पालिकेतील लाचखोरांची एकूण संख्या ४७ झाली आहे. पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे, अशी टीका सर्वस्तरातून होत आहे.
जल, मलनिस्सारण विभागातील साहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी बिर्ला महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर एका पेट्रोलपंप चालकाकडून चाळीस हजाराची लाच घेताना पकडले. त्याचवेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील सर्वोदय माॅलमधील घनकचरा विभागाच्या कार्यालयात पथकाने देगलुरकर, जाधव यांना लाच घेताना अटक केली. एकावेळी तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पालिकेतील आरोग्य विभाग, लेखा अभियांत्रिकी विभागातील गैरव्यवहारांवर नागरिकांनी टीकेचे झोड उठवली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनुपमा खरे यांच्या पथकाने देगलुकर, जाधव यांच्या अटकेची कारवाई केली. या दोघांविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की घनकचरा विभागातील एक सफाई कामगार अनेक दिवस आजारी होता. ते कामावर पुन्हा रूजू करून घ्यावे म्हणून मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर यांच्याकडे तगादा लावत होते. हजर करून घेण्यासाठी देगलुकर यांनी सफाई कामगाराकडे ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने सफाई कामगाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चारवेळा केलेल्या पडताळणीत देगलुरकर सफाई कामगाराकडे तडजोडीने २५ हजार रूपये मागत असल्याचे निष्पन्न झाले. स्वच्छता निरीक्षक सुदर्शन जाधव हेही तक्रारदार कामगाराला २५ हजार रूपये देगलुरकर यांना देण्यासाठी तगादा लावत होते, असे पडताळणीत आढळले.
गुरूवारी दुपारी तक्रारदार कामगाराने मुख्य स्वच्छता निरीक्षक देगलुरकर यांच्या सर्वोदय माॅल येथील घनकचरा विभागाच्या दालनात प्रवेश केला. त्यांना २० हजार रूपयांची लाच दिली. त्यानंतर काही क्षणात बाहेर सापळा लावून बसलेल्या पथकाने देगलुरकर यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
स्पर्धेचा बळी
देगलुरकर यांनी घनकचरा विभागातील एका स्वच्छता अधिकाऱ्याला डावलून मुख्य स्वच्छता अधिकारी पद पटकावल्याची चर्चा आहे. नोकरीचे दोन वर्ष शिल्लक असल्यामुळे ते आता साहाय्यक आरोग्य अधिकारी पदासाठी पात्र ठरणार होते. या पदावर दावा असलेल्या अन्य एका स्पर्धक अधिकाऱ्याला देगलुरकर यांचे डावपेच त्रासदायक ठरल्याने वरिष्ठ पदाच्या रस्सीखेचीमध्ये देगलुकर लाचेचे बळी ठरल्याची चर्चा पालिकेत आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचीच स्पर्धा घातक असल्याचे मत वेळोवेळी वरिष्ठांनी व्यक्त केले आहे.