कल्याण : बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल दिनकर पाटील यांनी दोन दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची त्यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात भेट घेतली. त्यांना प्रभागातील नागरी समस्यांसंदर्भात एक निवेदन दिले.

आडिवली ढोकळी प्रभागातील रस्ते आणि इतर नागरी समस्यांसंदर्भात हे पत्र असल्याची माहिती आयुक्त कार्यालयातून मिळाली. सन २०१५ ते सन २०२० या कालावधीत कुणाल पाटील यांनी आडिवली ढोकळी प्रभागाचे नेतृत्व केले. पालिकेच्या महासभांना ते नियमित उपस्थित राहत. आपल्या आडिवली ढोकळी प्रभागातील रस्ते, पदपथ, गटारे कामे मार्गी लावण्यात, या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

डोंबिवलीसह इतर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणात माजी नगरसेवक कुणाल पाटील हे पोलिसांना चौकशीसाठी हवे आहेत. अशा परिस्थितीत कुणाल पाटील यांनी अचानक पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त गोयल यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुणाल पाटील यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते पालिकेत आले आहेत ते दिसत नाहीत का, असे प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. कडक शिस्तीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पाटील यांना पटकन भेट कशी केली, असाही अनेकांच्या चर्चेचा सूर आहे.

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. येत्या दोन महिन्यानंतर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने माजी नगरसेवक कुणाल पाटील पुन्हा आपल्या आडिवली ढोकळी प्रभागात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. अपक्ष असलेल्या कुणाल पाटील यांनी शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपमध्ये यावे म्हणून विविध पक्षाच्या नेत्यांनी चार वर्षापूर्वी प्रयत्न केले. ते आपल्या पक्षात येत नाहीत म्हणून त्यांना राजकीय दबावातून त्रास देण्याचे प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही प्रभावशाली मंडळींनी केले. हा त्यावेळी मोठा चर्चेचा विषय झाला होता. ते आपल्या पक्षात येत नाहीत म्हणून इतर कटकारस्थानांमध्ये त्यांना अडकविण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

आडिवली ढोकळी प्रभागात कुणाल पाटील पु्न्हा सक्रिय झाल्याने या भागातील राजकारण पुन्हा तप्त होण्याची चिन्हे आहेत. आडिवली ढोकळी भागातील बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात नेहमीच चर्चेचा विषय असतो. या प्रभागातील जुन्या, नव्या बेकायदा बांधकामांची डोकेदुखी पालिका अधिकाऱ्यांना नेहमीच सतावत असते. पालिका वरिष्ठांनी बेकायदा तोडण्याचे आदेश दिले की स्थानिक पातळीवर राजकीय विरोधामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाई करताना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागते, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया

आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी समस्यांसंदर्भात आपण पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. त्यांना आपल्या प्रभागातील मागण्यांचे एक निवेदन दिले. आयुक्त नवीन असल्याने त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कुणाल पाटील माजी नगरसेवक.