कल्याण – आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून कल्याण, डोंबिवलीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासह इतर पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याची जोरदार स्पर्धा भाजप, शिंदे शिवसेनेमध्ये लागली आहे. कल्याण पूर्व वालधुनी, अशोकनगर परिसरातील ठाकरे गटातील उपशहर संघटक, शहरप्रमुख अशा सुमारे १५ हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

कल्याण पूर्व भागात जुने जाणते शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिरोधार्य मानून पक्षप्रमुुख उध्दव ठाकरे यांच नेतृत्व मान्य करून कल्याण पूर्वेत ठाकरे गटात ठाण मांडून होते. पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग आहेत. पालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून जायचे असेल तर भाजप, शिंदे शिवसेने शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मनसे, ठाकरे गट, काँग्रेससह इतर पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप, शिंदे शिवसेनेत जोरदार चढाओढ सुरू आहे.

या चढाओढीतून कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांच्याकडे कल्याण पूर्व वालधुनी, अशोकनगर, छत्रपती शिवाजी नगर परिसरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत येण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. हा विषय शहरप्रमुख शिंदे यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना सांगितला. तातडीने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील, कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, जिल्हाप्रमुख छाया वाघमारे, शहर संघटक पुष्पा ठाकरे, माजी नगरसेवक गणेश जाधव यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाखाप्रमुख समीप काळे, उपशहर संघटक दयानंद जाधव, विभागप्रमुख नितीन मोरे, विभागप्रमुख दर्शना काळे, शहर संघटक महेश बोबडे, अमोल जुंदरे, निजाम खान, आयवान सॅन्डी, आफझर शेख, विकी हिरवले, ॲड.माया गायकवाड, गणेश चिखले या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

याशिवाय उत्तर भारतीय विभागाचे कल्याण शहर प्रमुख सी. पी. मिश्रा यांच्या पुढाकाराने उत्तर भारतीय समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभा कल्याण अध्यक्ष विजयेंद्र उमाकांत सिंह, कोषाध्यक्ष राजेंद्र सिंंह, सृजन संस्थेचे बृजेश दीक्षित, युवा वाहिनी कावड यात्रेचे सदस्य मनोज तिवारी, रोहित वर्मा, मनीष यादव यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक विद्याधर भोईर, भूषण यशवंतराव, माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शहर परिसरात सुरू केलेली विकास कामे आणि सर्व घटकांसह सामान्य लोकांची होणारी झटपट कामे पाहून कल्याण पूर्वेतील ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.- नीलेश शिंदे शहरप्रमुख, शिवसेना, कल्याण पूर्व.

(कल्याण पूर्वे ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेत दाखल.)