कल्याण – शास्त्रीय संगीत, गायनाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कल्याणमधील गायन समाजाला सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा चालू वर्षीचा शताब्दी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अलीकडेच कल्याण गायन समाजाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे.

हा पुरस्कार वितरणाचा सोहळा २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे सात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणारआहे. यावेळी बिर्ला महाविद्यालयाचे संचालक प्रा. डाॅक्टर नरेशचंद्र, शताब्दी पुरस्कार समिती न्यायासाचे चिटणीस डाॅ. रत्नाकर फाटक, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, श्रीकांत जोशी, भालचंद्र जोशी, मुयरेश आगलावे हे संचालक उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रती, संस्थांना प्रेरणा म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवातर्फे शताब्दी पुरस्कार दिला जातो. मागील ३१ वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. कल्याण गायन समाज संस्थेने मागील शंभर वर्षाच्या काळात शास्त्रीय संगीताची आवड रसिकांमध्ये जोपासली. त्यांना सातत्याने संगीत श्रवणाचा आनंद दिला. आताही कल्याण गायन समाजाचे कार्य जोमाने सुरू आहे. गायन समाजाच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार समितीने या संस्थेची शताब्दी पुरस्कारासाठी निवड केली आहे. या श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी, परेश भिडे, मोहित ताम्हनकर, भूषण घारपुरे, स्नेहल करमकर उपस्थित राहणार आहेत.

शताब्दी वर्षात झालेल्या २५ हजार रूपयांच्या निधी संकलनातून जमा झालेली रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेऊन त्यात देणगीदारांनी दिलेल्या देणगीची भर घालून त्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा एकतिसवा पुरस्कार सोहळा आहे. गेल्या तीस वर्षाच्या काळात शिक्षण, आरोग्य, वनवासी मित्र, समाजसेवा, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय रुग्ण सेवा, धर्मजागरण, कायदा अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाव्रती संस्था, व्यक्तिंना सुभेदारवारवाडा गणेशोत्सव मंडळांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ गायक गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १० जुलै १९२६ रोजी कल्याण गायन समाजाची स्थापना कल्याणमध्ये करण्यात आली. पूर्वीच्या काळात संगीत क्षेत्रातील दक्षिणेचे ग्वाल्हेर म्हणून कल्याणचा उल्लेख होत होता. शास्त्रीय संगीतप्रेमी दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे यांनी पुढाकार घेऊन कल्याण गायन समाजाची स्थापना केली. शास्त्रीय संगीताची रूजवण आणि प्रसार हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गायन समाजाची स्वतंत्र घटना आहे. या घटनेप्रमाणे गायन समाजाचा कारभार चालतो.