कल्याण – दुपारी भोजनाच्या वेळेत बहिणीच्या घरी पोहचून राखी बांधून झाल्यावर पुन्हा परतीची गणित करणारे लाडके भाऊराया शनिवारी रक्षा बंधनाच्या दिवशी कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत पाच तासाहून अधिक काळ अडकून पडले. भोजनाची वेळ टळून गेली तरी भाऊराया घरी न पोहचल्याने अनेक बहिणी हिरमुसल्या. मागील दोन दिवसांपासून शीळ रस्ता कोंडीने गजबजून गेला आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.
अंबरनाथ भागात असलेला न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायालयातील वरिष्ठ या रस्त्यावरून जाणार असल्याने काटई बदलापूर रस्ता, कल्याण शीळ रस्ता रस्ता किमान शनिवारी तरी वाहतुकीसाठी सुटसुटीत असेल असा विचार करून अनेक नागरिक आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी वाहनाने निघाले होते. अनेक बहिणी आपल्या भावाकडे राख्या बांधणीसाठी वाहनाने निघाल्या होत्या. कल्याण शीळ रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांच्या रांगा बघून प्रवासी अस्वस्थ झाले. सकाळपासून ही कोंडी कायम असल्याचे आणि पाच तासाहून अधिक काळ आम्ही कोंडीतून प्रवास करत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ येथील न्यायालय उद्घाटन कार्यक्रमासाठी ठाणे येथून हेलिकॉप्टरने जाणे पसंत केले. त्यामुळे ते कोंडीच्या विळख्यातून बचावले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शीळ रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
काटई ते खिडकाळी भागातील सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थांंनी रस्त्याची भरपाई मिळत नाही, तोपर्यंत एक इंच जमीन शीळ रस्त्यासाठी न देण्याचा निर्धार केला आहे. या भरपाईसाठी सुमारे ३०७ कोटी शासनाने मंजूर केले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात ही रक्कम मिळण्याची शक्यता होती. निवडणुका संपल्या आणि भरपाईचा विषय नंतर राजकीय मंडळींनी गुंडाळला. त्याचा फटका आता प्रवाशांना बसत आहे.
काटई ते खिडकाळी भागातील अरुंद रस्ते, या रस्त्यावर सुरू असलेली मेट्रो मार्गाची कामे त्यामुळे रस्ते अनेक ठिकाणी अरूंद आहेत. अवजड वाहने या भागातून एक मार्गिकेतून धावतात. पाठीमागे वाहनांचा रांगा लागतात. शीळ रस्त्यावरून एका वेळी कर्जत बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील वाहने धावतात. याशिवाय बाहेरून येणारी मालवाहू वाहने याच रस्त्यावरून धावतात. ही वाहने एकावेळी सामावून घेण्याची क्षमता शीळ रस्त्याची नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
शनिवारी सकाळी शीळ रस्त्यावरून धावणारी वाहने दुपार झाली तरी सोनारपाडा, मानपाडा, काटई, पलावा चौक, खिडकाळी, देसाई गाव, काटई बदलापूर रस्त्यावर अडकून पडली होती. या कोंडीत बहिणीकडे निघालेले भाऊराया अडकून पडले. जेवणाची वेळ टळत आली तरी दादा येत नाही म्हणून दादा कुठे आहेस, म्हणून बहिणी दादाला संपर्क करून थकल्या. घोडबंदर वाहतूक कोंडीचा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने घेतला. तसाच शीळ रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी प्रवाशांची आहे.