कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे शुक्रवारी सकाळी घाईघाईने शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि शिवसैनिकांनी घाईघाईत उद्घाटन करून पूल प्रवाशांसाठी खुला केला. नव्या पुलावरील रस्त्यावर डांबर, सीमेंट आणि रसायन मिश्रणाचा (मास्टेक अस्फाल्ट) विशिष्ट थर पसरविण्याचे बाकी असताना पुलाचे उद्घाटन केल्याने काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर प्रवाशांना आता थरारक अनुभव येत आहेत.

पुलाचे उद्गाटन केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात दोन ते तीन दुचाकी स्वार घसरून पडले. उद्घाटन होत असताना एक दुचाकी स्वार सर्व उपस्थित पाहुण्यांच्या समोर पडला. त्याचे गांभीर्य लक्षात न आल्याने उद्घाटनानंतर आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि इतर पदाधिकारी निघून गेले.

त्यानंतर नवीन काटई निळजे रेल्वे उड्डाण पुल हा घसरगुंडी म्हणून प्रवाशांना खुला करून दिला का, असे प्रश्न नंतर उपस्थित करण्यात आले. या पुलाचे स्थापत्य काम पूर्ण झाले असले तरी पुलावर वाहनांची चाके घसरू नयेत म्हणून विशिष्ट रसायन मिश्रित (मास्टेक अस्फाल्ट) एक थर पुलावरील रस्त्यावर टाकला जातो. वाहन या गुळगुळीत रस्त्यावर समतलपणे धावतात. सर्व पुलावर हेच मिश्रण वापरले जाते, असे रस्ते बांधकाम क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.

पुलावर वाहने घसरू लागल्याने सुरूवातीचे दोन तास काटई निळजे पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला. या पुलाच्या काही भागात डांबर मिश्रीत रसायन टाकण्यात आले. काही ठिकाणी खडीची पावडर (ग्रीट) टाकून रस्ता वाहने घसरू नयेत म्हणून सुस्थितीत करण्याचे प्रयत्न ठेकेदाराने केले. रस्त्यावर थर टाकण्याचे नियोजन फसल्याने चुकीच्या पध्दतीने शुक्रवारपासून पुलावर वाहने घसरू नयेत म्हणून प्रयोग केले जात असल्याने पुलावर आता माती, खडी पावडर आणि पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

प्रवाशांचे अनुभव

काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावरून जाताना काही भागात डांबराचे पट्टे, काही ठिकाणी सिमेंटचे टप्पे दिसून आले. काही ठिकाणी खडी पावडरचा चुरा दिसून आला. पुलावरील रस्त्यावर कोणताही समतलपणा दिसून येत नाही. काटई निळजे उड्डाण पूल आहे की घसरगुंडी असा प्रश्न या पुलावरून जाताना येते. – रमेश भागवत, प्रवासी.

काटई निळजे पुलाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतच्या रस्त्यावर कोणताही समतलपणा नाही. काही ठिकाणी डांबर, काही ठिकाणी सिमेंट, बारीक खडी दिसते. पुलावरून काटई दिशेने उतरताना पाण्यातील होडीला खडक लागल्यानंतर जसा धक्के बसतात, थडथड आवाज येतो तसे अनुभव प्रवाशांना मिळत आहेत. हा पूल मोठा अभ्यासाचा विषय आहे. – मंदार अभ्यंकर, प्रवासी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काटई निळजे पुलाची बांधणी पूर्ण झाली आहे. त्याची सुरक्षितता तपासा, असे पत्र ठेकेदाराने एमएमआरडीएला दिले होते का. एमएमआरडीएच्या दक्षता आणि गुणनियंत्रण, प्रवासी सुरक्षा विभागानेे या पुलाची पाहणी करून पूल वाहतुकीसाठी योग्य आहे असे प्रमाणपत्र दिले आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. – निळकंठ जोशी, प्रवासी.