डोंबिवली- ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातील बहुतांशी आमदार, खासदार ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात दाखल झाले आहेत. आता उरलेले आमदार, खासदार कोठे जाऊ नयेत. ते आपल्या भोवती गिरक्या घेत रहावेत यासाठी मध्यावधी निवडणुकांचे भूत उभे करण्यात येत आहे. अशी कितीही भूत उभी केली तरी इतर पक्षांसह मूळ शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत, असे भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी काटई येथे करुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली : ठाकुर्लीतील जवाहिऱ्यांकडून महिलांची ११ लाखाची फसवणूक

काटई गावातील शिवसेनेचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांनी आयोजित केलेल्या तुळशी विवाह समारंभाला खा. शिंदे यांनी रविवारी रात्री उपस्थिती लावली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या अडीच वर्षाच्या काळात मनसेचे काटई गावचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील आणि खासदार डॉ. शिंदे यांच्यात विकास कामांवरुन नेहमीच कलगीतुरा रंगलेला आहे. काटई येथे आले की ते नेहमी आ. पाटील यांना शाब्दिक चिमटा घेत होते. काटई येथे येऊनही विकास कामे किंवा अन्य विषयावर मनसे आमदारांना चिमटा किंवा कोपरखळी न मारल्याने मनसे-‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष यांचे सूत जुळत चाललय अशी चर्चा २७ गाव भागात सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पाकीट चोराला वाहतूक पोलिसांनी पकडले

‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी मध्यवधी निवडणुकांचे भाकित वर्तवले. याविषयी खा. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला आता स्थिर सरकार मिळाले आहे. अतिशय गतिमानतेने सरकार वाटचाल करत आहे. विकास कामे, नागरी विकास, शेतकरी, आदिवासी विकास, अनेक वर्षाचे रेंगाळलेले प्रकल्प याविषयी धडाधड निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतले जात आहेत. हा गतिमानतेचा प्रवास काहींना सहन होत नाही. या गतिमानतेमुळे समोरील काही उरलेले आमदार, खासदार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येण्यासाठी सज्ज आहेत. ही तिकडची (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) शिल्लक मंडळी कोठे जाऊ नये. त्यांनी आपल्या भोवती रांगत राहवे म्हणून मध्यावधी निवडणुकांची पुडी सोडून देण्यात आली आहे, असे वक्तव्य खा. शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विधानावर केले.

हेही वाचा >>> पोलिसांच्या उपद्रवाने कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर हैराण ; भौगोलिक हद्दी शोधण्याचे डॉक्टरांना काम

शिल्लक आमदारांना खेळण्यासाठी रिझविण्यासाठी मध्यावधी निवडणुकांचे खेळणे फेकण्यात आले आहे. हे एक भूत आहे. असे कितीही खेळ केले तरी सरकारच्या धडाधड निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अनेक आमदार, खासदार आमच्या पक्षाच्या वाटेवर आहेत. योग्य वेळी कोण, कोणाच्या बाजुला ते कळेलच, असे वक्तव्य करुन खा. शिंदे यांनी खळबळ उडून दिली आहे. या वक्तव्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. सरकारच्या गतिमानतेमुळे येत्या दोन वर्षांनी राज्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज राजकीय मंडळींसह जनतेलाही आला आहे. त्यामुळे आता पुड्या फेकून राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी खोचक टीका खा. शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan mp shrikant shinde slams uddhav thackeray in dombivli zws
First published on: 07-11-2022 at 14:08 IST