कल्याण – कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गाव हद्दीत डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालय रूग्णालयामध्ये सोमवारी संध्याकाळी रुग्णालय स्वागत कक्षातील एका तरूणीला एका तरूणाने बेदम मारहाण केली. या तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असताना इतर रूग्ण नातेवाईक मध्ये पडल्याने मोठा अनर्थ टळला. या तरूणा विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोकुळ झा असे मारहाण करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. रुग्णालयातील स्वागतिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोकुळ झा विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे. या मारहाण प्रकरणावरून वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोकुळ झा याला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

तक्रारदार तरुणीने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रुग्ण बालरोग तज्ज्ञ डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या रुग्णालयात आले होते. सर्व रुग्ण, नातेवाईक डाॅक्टरांच्या प्रतिक्षेत होते. संध्याकाळी साडे सहा वाजता डाॅक्टर आल्यानंतर काही औषध विक्रेते प्रतिनिधी पहिले डाॅक्टरांना भेटण्यासाठी दालनात गेले. डाॅक्टरांच्या सूचनेप्रमाणे कोणाला डाॅक्टर दालनात सोडायचे याचे काम बाहेर स्वागत कक्षात स्वागतिका करत होत्या. दालनात डाॅक्टर आणि औषध विक्रेते प्रतिनिधी (एमआर) चर्चा करत होते. त्यावेळी दालनाच्या बाहेर अन्यना झा आपल्या बाळासोबत आल्या होत्या. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक होते. एक २५ वर्षाचा तरूण त्यांच्या सोबत तेथे आला होता.

काही वेळाने अनन्या झा आपल्या बाळाला घेऊन त्या तरूण मुलासह डाॅक्टर दालनात चर्चा करत असताना घुसायला लागले. त्यावेळी दालनात डाॅक्टर औषध विक्रेते प्रतिनिधींसोबत चर्चा करत आहेत. ते बाहेर आले की तुम्हाला मी आत सोडते, असे सोनाली यांनी अनन्या झा आणि तिच्या सोबतच्या तरूणाला सांगितले. आणि त्यांना रोखून धरले. त्यावेळी त्या तरूणाने स्वागतिका यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. दालनात बसलेत त्यांना पहिले बाहेर बोलव, असे सांगत आम्हाला आत जायचे आहे, असे बोलून तो बडबड करत स्वागत कक्षाच्या बाजुला गेला. त्यानंतर तो तरूण काही वेळाने पुन्हा स्वागत कक्षात स्वागतिकेला शिवीगाळ करत आला. त्याने स्वागतिका यांना काही कळण्याच्या आत त्यांच्या छातीवर जोराने लाथ मारली. त्यांचे केस पकडून त्यांना धरून उचलआपट केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आक्रमक तरूणाने स्वागतिका यांना मारहाण सुरू करताच रुग्ण नातेवाईक मध्ये पडून त्यांनी गोकुळ झाच्या तावडीतून स्वागतिकेची सुटका केली. हा ओरडा ऐकून दालनातून डाॅक्टर बाहेर आले. झालेला गोंधळ शमल्यानंतर सोनाली यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरूणाविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याने मारहाण, विनयभंग कलमाने गुन्हा दाखल केला आहे.